पुढारी ऑनलाईन डेस्क : हर्षद मेहताचा घोटाळा उघडकीस आणणाऱ्या पत्रकार सुचेता दलाल यांच्या एका ट्विटमुळे सोमवारी अदानी ग्रुपच्या कंपन्यांना मोठा फटका बसला. त्यांचे शेअर्स ५ ते २० टक्क्यांनी घसरले. अदानी ग्रुपमध्ये ज्यांनी पैसे गुंतवले त्यातील तीन विदेशी कंपन्यांची खाती नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडने (एनएसडीएल) गोठवल्याचे वृत्त समोर आले. अल्बुला इन्वेस्टमेंट फंड, क्रेस्टा फंड आणि एपीएमएस इन्वेस्टमेंट फंड अशी या तीन कंपन्यांची नावे आहेत. या कंपन्यांची अदानी ग्रुपमध्ये सुमारे ४३ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक असून त्यांचे शेअर्स गोठवण्यात आले. यामुळे अदानी ग्रुपच्या या कंपन्यांना मोठा फटका बसला.
वाचा : स्कूटर ते हेलिकाॅप्टर! श्रीमंत गौतम अदानी आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत कसे झाले…
सुचेता दलाल यांच्या एका ट्विटमुळे अदानींना मोठा झटका बसला. दलाल यांनी त्यांच्या ट्विटमध्ये कोणत्याही कंपनीच्या नावाचा उल्लेख केलेला नाही. 'आणखी एक घोटाळा जो उघडकीस आणणं कठीण आहे.' असे ट्विट करत सुचेता दलाल यांनी एका ग्रुपमध्ये मोठा घोटाळा असल्याचे संकेत दिले. याआधीही असे घोटाळे उघडकीस आले आहेत. सुचेता दलाल यांनी १९९२ चा हर्षद मेहता घोटाळा उघडकीस आणला होता. त्यावेळी संपूर्ण शेअर बाजार हादरला होता. या घोटाळ्यावर आधारीत 'स्कॅम १९९२-द हर्षद मेहता स्टोरी' ही वेब सीरिजही बनवण्यात आली. सुचेता दलाल आणि देबाशीष बसू यांच्या 'द स्कॅम' या पुस्तकावर ही वेब सीरिज आधारित आहे. आता पुन्हा त्या एका ट्विटमुळे चर्चेत आल्या आहेत.
सुचेता दलाल ह्या बिझनेस पत्रकार आणि लेखिका आहेत. कायद्याचे शिक्षण घेतलेल्या सुचेता यांनी १९८४ मध्ये पत्रकारितेला सुरुवात केली. 'टाईम्स ऑफ इंडिया'मध्ये त्यांनी अर्थविषयक संपादक म्हणून काम पाहिले. त्यानंतर त्या 'इंडियन एक्स्प्रेस ग्रुप'मध्ये सल्लागार संपादक म्हणून होत्या. २००८ पर्यंत त्यांनी 'इंडियन एक्स्प्रेस आणि फायनान्सियल एक्स्प्रेस'मध्ये स्तंभलेखन केले. १९९२ चा हर्षद मेहता घोटाळ्यासह एनरॉन घोटाळा, इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया घोटाळा, २००१ मधील केतन पारेख घोटाळा आदी प्रकरणे त्यांनी उजेडात आणली.
वाचा : सुचेता दलाल यांचे एक ट्विट आणि गौतम अदानींचे शेअर्स २० टक्क्यांनी घसरले
पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना २००६ मध्ये पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले होते. चमेली देवी जैन पुरस्कार, फेमिना वुमन ऑफ सबस्टन्स पुरस्कारानेही त्यांचा सन्मान करण्यात आला आहे.