Durlabh Kashyap : फेसबुकवरून खुनाच्या सुपारीची जाहिरात करणारा दुर्लभ कश्यप आहे तरी कोण?

फेसबुकवरून खुनाच्या सुपारीची जाहिरात करणारा दुर्लभ कश्यप आहे तरी कोण?
Durlabh Kashyap
Durlabh Kashyap : फेसबुकवरून खुनाच्या सुपारीची जाहिरात करणारा दुर्लभ कश्यप आहे तरी कोण? Durlabh Kashyap

पुढारी ऑनलाईन डेस्क : डाॅन, भाई, अण्णा… अशी बिरुदावली मिरवत गुन्हेगारीविश्वात आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी आणि आपापल्या परिसरात दहशत माजविण्यासाठी शालेय वयातील विद्यार्थी सध्या मोठ्या प्रमाणात आघाडीवर आहेत. आता ही मुलं आपली दहशत आणि गुंडागर्दी प्रस्थापित करण्यासाठी सोशल मीडियाचा जबरदस्त वापर करत आहेत. त्यांच्यावर उजैनच्या खून झालेल्या दुर्लभ कश्यपचा (Durlabh Kashyap) प्रचंड प्रभाव आहे. हा दुलर्भ ज्या पद्धतीने आपल्या दहशतीची हवा सोशल मीडियावर करायचा, नेमकं त्याच पद्धतीने औरंगाबादमधील मुलांनी आपली हवा केली आहे. यांचा आदर्श कोण… त्यांनी हे कृत्य करण्याची प्रेरणा कुठून घेतली… कोण आहे हा दुर्लभ कश्यप… त्याचे एवढे फाॅलोअर्स… या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहू या…

गुंड दुर्लभ कश्यप कोण आहे?

दुर्लभ कश्यप हा उजैनचा कुख्यात गुंड. सर्वात लहान गुंड म्हणून त्याला ओळखलं जातं. गुन्हेगारी क्षेत्रात वयाच्या १६ व्या वर्षी आला होता. सोशल मीडियावर त्याची चांगलीच हवा होती. सिगारेट ओढणं, हुक्का ओढणं, त्याचा धूर हवेत सोडणं, हत्यारांसहीत फोटो पोस्ट करणं, इतकंच नाही तर त्याने आपल्या प्रोफाईलमध्ये खुल्यापणाने लिहिलं होतं की, "कुख्यात बदमाश+हत्यारा+पिवर अपराधी+कोणसाभी और कैसाभी विवाद करना हो तो मुझे संपर्क करे!!!", अशा पद्धतीने त्यानं उघडपणाने सुपारी घेत असल्याची जाहिरात केलेली होती.

फेसबुक, इन्स्टाग्राम आणि इतर सोशल मीडियावर त्याचे प्रचंड फाॅलोअर्स होते. सोशल मीडियावर फेमस डाॅन म्हणूनही त्याला ओळख मिळालेली होती. उजैनमधील शाळकरी आणि महाविद्यालयीन पोरांनीही आपलं घरदार सोडून त्याची गॅंग जाॅईन केलेली होती. गळ्यात जाड माळा, खांद्यावर पांढऱ्या रंगाचं कापडी उपरणं, अंगात काळा शर्ट, वाढवलेली दाढी, डोळ्यात काजळ, कपाळावर लाल रंगाचा आडवा टीळा आणि तोंडात धूर सोडत असणारं सिगार…असा त्याचा पेहराव होता. त्याचं आकर्षण आजही शाळकरी आणि महाविद्यालयीन मुलांच्यात आहे.

दुर्लभवर १८ वयापर्यंत ९ केसेसे दाखल होते. २०१८ मध्ये त्याला आणि त्याच्या २३ साथीदारांना सोशल मीडियातील आक्षेपार्ह मजकुरावरून अटक करून जेलमध्ये टाकलं. त्यावेळी एसपी सचिन अतुलकर यांनी दुर्लभला सांगितलं होतं की, "दुर्लभ तू कमी वयात जास्त शत्रू करून ठेवले आहेत. त्यामुळे जोपर्यंत तुरुंगात आहेस तोपर्यंत जीवंत आहेस. ज्या दिवशी तू तुरूंगातून बाहेर जाशील, तेव्हा तुझा खून नक्की होणार…" पोलीस अधिकारी अतुलकर यांचे भविष्य खरे ठरले.

दुर्लभ जामीनावर बाहेर आला. ६ सप्टेंबर २०२० मध्ये आई आणि मित्रांसोबत जेवण केल्यानंतर तो रात्री १ वाजता एका पानटपरीवर सिगारेट आणि चहा पिण्यासाठी गेला. तिथं दुसरी गॅंग उपस्थित होती. त्यामध्ये शहनवाज, शाबाद, इरफान, राजा, रमीज आणि त्याचे भाऊ टपरीवर होते. पूर्ववैमनस्यातून शहनवाज आणि दुर्लभ यांच्या वाद झाला. हनवाजच्या खांद्यावर गोळी चालवली, तो जखमी झाला. शहनवाज आणि त्याच्या मित्रांनी दुर्लभवर (Durlabh Kashyap) चाकून सपासप वार करण्यास सुरू केले. दुर्लभचे मित्र पळून गेले. तब्बल ३४ वार दुर्लभवर करण्यात आले. २० व्या वर्षांतच दुर्लभचा मृत्यू झाला.

गुंड दुर्लभ कश्यपच्या स्टोरीचं निमित्त काय?

…तर औरंगाबादमध्ये स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या शुभम मनगटे नावाच्या तरुणाची छोटंसं दुकान आहे. काही दिवसांपूर्वीच त्याच्या दुकानात तरुणांचं टोळकं आलं. त्यांनी फुकट गुटखा मागितला. त्याने देण्यास नकार दिला. या कारणातून शुभमला त्यांनी दुकानातून उचलला आणि मोकळ्या मैदानात नेला. त्याच्यावर तलवार, चाकू आणि फायटरने सपासप वार केले.

शुभम जीवाच्या आकांताने ओरडू लागला. पण, त्याला वाचविण्यासाठी कुणीच पुढे आलं नाही. कारण, या टोळीने खुली धमकी दिली होती की, "कुणी पुढं आलं तर त्याचीही अशीच अवस्था केली जाईल." शेवटी शुभमचे मित्र धावून आले आणि त्याचा जीव वाचला. ही टोळी पळून गेली.

या टोळीत राजू पठाडे, यश पाखरे, शुभम मोरे, आतिष मोरे, शेख बादशहा, निलेश धस, पिन्या खडके, अशी मुलं होती. पोलिसांना या टोळीबद्दल माहिती होतं. पण, ही टोळी इतकी हिंस्र होईल, याची कल्पना पोलिसांनाही नव्हती. या प्रकरणात सर्वांवर गुन्हा दाखल केला आहे. काही दिवसांपूर्वी एका लग्नात यश पाखरे आणि शेख बादशहा नंग्या तलवारी घेऊन नाचले होते, त्याचा व्हिडिओही त्यांनी सोशल मीडियावर व्हायरल केला होता. या गुन्ह्यातील सर्व तरुण आरोपी हे उज्जैनच्या दुर्लभ कश्यपचे (Durlabh Kashyap) प्रचंड चाहते आहे, ते त्याला फाॅलो करतात. त्यामुळे ही भयानक घटना महाराष्ट्रातही घडली.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news