

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि कॅनडा (India-Canada row) यांच्यात तणाव वाढला आहे. याच दरम्यान भारताने कॅनडाच्या बॉर्डर सर्व्हिस एजन्सीच्या (CBSA) एका अधिकाऱ्याच्या नावाचा फरार दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला आहे. संदीप सिंग सिद्धू असे त्याचे नाव आहे. त्याचा दहशतवादाशी थेट संबंध असल्याचा आरोप करत भारताने संदीप सिंग सिद्धूच्या प्रत्यार्पणाची मागणी केली आहे. भारत सरकारने कॅनडातील जस्टिन ट्रूडो (Justin Trudeau) प्रशासनाला ही यादी सोपवली आहे. त्याचे नाव, फोटोही पाठवला आहे. खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याच्या हत्येवरून दोन्ही देशांमधील संबंध ताणले गेलेले असताना ही घडामोड आता समोर आली आहे.
वृत्तानुसार, प्रतिबंधित इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशन (ISYF) चा सदस्य आणि सीबीएसएमध्ये सेवा देत असलेल्या संदीप सिंग सिद्धू याचा पंजाबमधील दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याच्या आरोपाखाली दहशतवाद्यांच्या यादीत समावेश केला आहे.
सिद्धू हा कथिरित्या २०२० मध्ये कॉम्रेड बलविंदर सिंग संधू यांच्या हत्येच्या कटात पाकिस्तानातील खलिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग रोडे याच्यासह इतर आयएसआय अधिकाऱ्यांच्या संपर्कात होता. संधू हे खलिस्तानी दहशतवाद्यांविरुद्ध लढले होते. संधू यांना त्यांच्या अतुलनीय शौर्याबद्दल शौर्य चक्रने सन्मानित करण्यात आले होते. शिख फॉर जस्टिस (SFJ) तर्फे अमेरिका आणि कॅनडातील खलिस्तान्यांचा विरोध करण्यासाठीही त्यांना ओळखले जाते. एका वृत्तानुसार, संदीप सिंग सिद्धू याला सीबीएसएमध्ये अधीक्षक पदावर बढती दिली आहे.
एका वृत्तानुसार, संदीप सिंग सिद्धू याला सनी म्हणूनही ओळखले जाते. सनी टोरंटो आणि पाकिस्तानी दहशतवादी लखबीर सिंग उर्फ रोडे हे संधू यांच्या हत्येच्या कटातील मास्टरमाईंड आहेत. पण, संदीप सिंग सिद्धूचे दुसरे नाव सनी टोरंटो आहे की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
भारताच्या एंजट्सचा कॅनडातील गंभीर गुन्हेगारी कृत्यांमध्ये थेट सहभाग असल्याचा आरोप नुकताच कॅनडाने केला. पण या आरोपांची पुष्टी करण्यासाठी कॅनडाने कोणतेही पुरावे दिलेले नाहीत. त्यामुळे भारताने हे बिनबुडाचे आरोप फेटाळून लावलेत. म्हणे कॅनडात असलेले भारतीय एजंट्स खलिस्तानी समर्थकांना टार्गेट करण्यासाठी लॉरेन्स बिश्नोई गँगसोबत (Bishnoi gang) काम करत असल्याचा गंभीर आरोप केला आहे.