स्‍मशानभूमीत वास्‍तव्‍य, मानवी कवट्यांचा भांडी म्हणून वापर..! कोण आहेत 'अघोरी' साधू? जाणून घ्‍या त्यांचं अध्यात्म

Maha Kumbh Mela 2025 : प्रयागराज महाकुंभमेळ्यानिमित्त 'अघोरी साधू' पुन्‍हा चर्चेत
Maha Kumbh Mela 2025
प्रातिनिधिक छायाचित्रFile Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क :

'अघोरी' हा शब्‍द जरी काेणी उच्‍चारला तरी भय आणि कुतूहल या दोन्‍ही भावना एकाच वेळी सर्वसामान्‍यांच्‍या मनात निर्माण होतात. स्‍मशानभूमीमध्‍ये वास्‍तव्‍य ... शरीरावर राखेचे लेपन करणे आणि मानवी कवट्या भांडी म्हणून वापरणे! अशा असामान्‍य आणि मनात भीतीचा थरकाप उडविणार्‍या प्रथा असणार्‍या 'अघोरी' संप्रदायातील साधूंची जीवनशैली ही नेहमीच सर्वांच्या मनात त्‍यांच्‍याविषयीचे गूढ गहीरे करणारी ठरते. भारतीय संस्कृतीतील श्रद्धा, भक्ती, परंपरा आणि विशाल मानवी समुदायाचा सोहळा ठरलेला महाकुंभमेळ्यात 'अघोरी' संप्रदायातील साधूंचा सहभागही त्‍यामुळेच चर्चेचा विषय ठरतो. जाणून घेवूया त्‍यांच्‍या अध्यात्म आणि गूढ जीवनशैलीविषयी...

कोण आहेत अघोरी साधू? 'अघोरी'  शब्दाचा चुकीचा अर्थ सामान्यांमध्ये प्रचलित

भारताच्‍या विविध संस्‍कृती, परंपरा आणि आध्यात्मिक पद्धतींमध्‍ये सर्वात गूढ अध्यात्मिक संप्रदायामध्‍ये अघोरींचा समावेश होतो. अघोरी म्हणजे स्मशानात बसून मंत्र-तंत्र पठण करणारे, भूत प्रेतांशी संवाद साधणारे आणि काहीसे राक्षसी असा अनेकांचा समज असतो. मात्र मुळात अघोरी या शब्दाचा चुकीचा अर्थ सामान्यांमध्ये प्रचलित झाला आहे. या चुकीच्‍या शब्‍दातूनच त्‍यांची प्रतिमा देखील चुकीच्या पद्धतीने रेखाटली गेली आहे. अघोरी हे भगवान शिवाचे अनुयायी आहेत. मात्र "अघोर" या संस्कृत शब्दाचा अर्थ भयमुक्‍त किंवा कोणालाही भयभीत न करणारा असा होतो. सर्व प्रकारच्‍या भय, आसक्ती आणि सामाजिक नियमांपासून मुक्‍त हाेत मोक्षप्राप्‍ती करणे अशी या संप्रदायाची श्रद्धा आहे.

अघोरी कोणत्या देवाची पूजा करतात?

अघोरी साधू हे महादेवाची पूजा करतात. ते महादेवाची पत्नी शक्तीचीही उपासना करतात. उत्तर भारतात स्त्रिया अघोरी संप्रदायाच्या सदस्य बनू शकतात. पश्चिम बंगालमध्ये स्त्रिया स्मशानभूमीतही दिसतात. मात्र अघोरी संप्रदायातील स्त्रियांना कपडे परिधान करणे अनिवार्य असते. मनोज ठक्कर यांनी 'अघोरी : अ बायोग्राफिकल नॉवेल' मध्‍ये लिहिलं आहे की, "बहुतांश माणसं मृत्यूला घाबरतात. स्मशानभूमी मृत्यूचे प्रतीक आहे. मात्र अघोरी इथूनच सुरुवात करतात. ते सामान्य समाजाची मूल्यं आणि नैतिकतेला आव्हान देऊ इच्छितात."

सर्वच शुद्धतेच्या नियमांपलीकडे जाणे...

लंडनमधील 'स्कूल ऑफ आफ्रिकन अँड ओरिएंटल स्टडिज'मध्ये संस्कृत शिकवणारे जेम्स मॅलिन्सन हे स्वतः एक महंत आणि गुरू आहेत. त्‍यांनी अघोरी संप्रदायातील अनेक सांधूंशी चर्चा करुन त्‍यांचे अध्‍यात्‍म जाणून घेण्‍याचा प्रयत्‍न केला होता. या संप्रदायाविषयी सांगतात की, आध्यात्मिक ज्ञान प्राप्‍त करणे आणि ईश्‍वराला भेटायचे असेल तर सर्वच शुद्धतेच्या नियमांपलीकडे जावे लागेल, असा अघोर दर्शनाचा सिद्धांत आहे. अघोरी संप्रदायात बाबा किणिराम यांना खूप मोठे स्थान आहे. अध्‍यात्‍मामध्‍ये अघोर हि कोणतेही पद नसून ती एक अवस्था मानली गेली आहे.

अघोरींचा इतिहास...कपालिक पंथातील बऱ्याच गोष्टी स्वीकारल्या

अघोरी पंथ हा शब्‍दा 18व्या शतकात व्‍यापक स्‍वरुपात चर्चेत आला. कपालिक पंथात मानवी कवटीशी संबंधीत अनेक रूढींसोबतच नरबळी देण्याचीही प्रथा होती. आता हा पंथ अस्तित्वात नाही. मात्र अघोरी पंथाने कपालिक पंथातील बऱ्याच गोष्टी स्वीकारल्या आहेत. हिंदूमधील पंथाचे अनुयायी संघटनात्मक पद्धतीने नियमांचे पालन करतात आणि सामाजिक पातळीवर विविध टप्प्यांत देवाणघेवाण होत राहते. मात्र याला अघोरी संप्रदाय अपवाद आहे. या संप्रदायातील साधू आपल्या कुटुंबीयांशी संपर्क पूर्णपणे तोडतात आणि बाहेरच्या व्यक्तींवर विश्वास ठेवत नाहीत, असे मॅन्‍लिसन सांगतात. अघोरी संप्रदायात साधूंच्या बौद्धिक कौशल्यात खूप अंतर दिसते. काही अघोरींची बुद्धी इतकी तल्लख होती की. ते राजा-महाराजांना सल्ला द्यायचे. एक अघोरी तर नेपाळच्या राजाचे सल्लागार होते, असेही मॅलिंसन सांगतात.

Pudhari

कुणाविषयीही द्वेषभावना नाही

'अघोरी : अ बायोग्राफिकल नॉवेल' हे पुस्तक मनोज ठक्कर यांनी लिहिले आहे. यामध्‍ये त्‍यांनी नमूद केले आहे की, अघोरी साधूंविषयी समाजात चुकीची, भ्रमित करणारी माहिती पसरवली गेली आहे. अघोरी खूपच साधी माणसं असतात. त्यांना निसर्गाच्या जवळ राहणे आवडते. त्यांची कुठल्याच प्रकारची मागणी किंवा अपेक्षा नसते. या जगामधील प्रत्‍येक वस्‍तू ही ईश्‍वराचा अंश आहे, अशी त्‍यांची श्रद्‍धा असते. ते कुणाचाही द्वेष करत नाहीत आणि कुठल्याच वस्तूला नकारत नाहीत. त्यामुळे मांसातही भेद करत नाहीत. प्राण्यांचा बळी देणे, त्यांच्या पूजा पद्धतीचा एक अविभाज्य घटक आहे. ते गांजा ओढतात. मात्र नशेतसुद्धा त्यांना स्वतःविषयी संपूर्ण जाण असते.

सृष्टीच्या एकतेवरील विश्वास

सामान्यपणे ज्या गोष्टींची घृणा वाटते त्यांचा सामना करून ती घृणा नष्ट करणे, असाही अघोरी साधूंचा सिद्धांत आहे. विश्वातील प्रत्येक गोष्ट, शुद्ध असो वा अशुद्ध, तितकीच पवित्र मानतायत. त्‍यामुळे चांगलं आणि वाईटाविषयीचे सर्वसामान्यांचे नियम आणि कल्‍पना त्यांना मान्य नसतात. आध्यात्मिक प्रगतीसाठी ते अनेक विचित्र क्रियांमधून जातात. इतरांनी वर्ज्य केलेल्या गोष्टींचे भक्षण करून ते परम चेतना प्राप्त करतात, असा त्यांचा विश्वास असल्‍याचे जेम्‍स मॅलिन्‍सन म्‍हणतात. पवित्रतेच्या पारंपारिक कल्पनांना आव्हान देतात. उदा, स्मशानभूमीत ध्यान करणे, इतरांना अखाद्य वाटणारे अन्न खाणे आणि समाज ज्या गोष्टी टाळतो त्या स्वीकारणे.

अघोरी सांधूंची गूढ जीवनशैली

भारतातील चार पवित्र तीर्थक्षेत्री दर १२ वर्षांनी महाकुंभमेळ्याचे आयाेजन केले जाते. हा केवळ मानवतेचा विचार करणारा हा एक आध्यात्मिक कार्यक्रम आहे त्‍याचबराेबर भारताच्या समृद्ध धार्मिक विविधतेचे दर्शन घडविणारा सोहळा आहे. पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्यासाठी जमणाऱ्या असंख्य यात्रेकरू, संत आणि साधूंमध्ये, अघोरी त्यांच्या विशिष्ट स्वरूपासाठी आणि गूढ पद्धतींसाठी वेगळे दिसतात. अघोरी निर्वस्त्र असतात, कवटीत जेवतात आणि दिवस-रात्र गांजा ओढतात, अशा गोष्टीही त्‍यांच्‍याविषयी पसरवल्या जातात.

सामाजिक रूढी आणि निषिद्धांना आव्हान

सामाजिक रूढी आणि निषिद्धांना आव्हान देते अघोरी असे जीवन जगतात. काही गोष्टी शुद्ध आहेत तर काही अशुद्ध आहेत ही कल्पनाच नष्‍ट करणे यासाठी अघाेरी आग्रही असतात. काेणतीही गाेष्‍ट निषिद्ध नाही. स्मशानभूमीत ध्यान करत जीवनाचा नैसर्गिक भाग म्हणून मृत्‍यूच्‍या भयाचा सामना करणे. याचा माध्‍यमातून परमात्म्याशी संबंध निर्माण हाेताे, अशी त्‍यांची श्रद्‍धा आहे. यातूनच अशुद्ध मानले जाणारे पदार्थ सेवन करत सर्व आसक्ती ओलांडण्यासाठी प्रतीकात्मक कृती करण्‍यावर त्‍यांचा भर असताे. ही कृती सर्वसामान्‍यांना धक्कादायक वाटू शकते; परंतु अघोरी संप्रदायातील साधू सामाजिक रूढी आणि निषिद्धांना आव्हान देणे हाच आध्यात्मिक ज्ञानाच्या समीप पोहचण्‍याचा मार्ग ठरवतात.

जीवनाच्या नश्वरतेची आठवण करुन देतात

अघोरी त्यांच्या खोलवरच्‍या आध्यात्मिक ज्ञानासाठी ओळखले जातात. ते स्वतःला शरीर आणि आत्म्याचे उपचार करणारे म्हणून पाहतात. अनेकांचा असा विश्वास आहे की त्यांची तीव्र तपश्चर्या आणि भक्ती त्यांना असाधारण शक्ती देते, ज्यामध्ये रोग बरे करण्याची, आशीर्वाद देण्याची आणि भविष्याचा अंदाज घेण्याची क्षमता देखील समाविष्ट आहे. त्‍यामुळे काहींना ते भयानक किंवा विचित्र वाटत असले तरी, त्यांची जीवनशैली स्वीकृती आणि पराकोटीच्या तत्वज्ञानात खोलवर रुजलेली आहे. त्यांच्या पद्धती, जरी अपारंपरिक असल्या तरी, आपल्याला जीवनाच्या नश्वरतेची आणि आध्यात्मिक वाढीच्या महत्त्वाची आठवण करून देण्याचा उद्देश आहे.

चिंतन, जीवन आणि मृत्यूच्या सखोल पैलूंवर चिंतन

कुंभमेळा हा आध्यात्मिक साधक, संत आणि परंपरांचा संगम आहे. अघोरी पहिल्या दृष्टीक्षेपात रहस्यमय किंवा अगदी भीतीदायक वाटू शकतात; परंतु त्यांचे जीवन एका खोल आध्यात्मिक प्रवासासाठी समर्पित आहे. कुंभमेळ्यातील त्यांची उपस्थिती जीवन आणि मृत्यूच्या सखोल पैलूंवर चिंतन करण्यास देखील आमंत्रित करते. आध्यात्मिक अंतर्दृष्टी किंवा भारताच्या विविध परंपरांचे व्यापक आकलन शोधणाऱ्यांसाठी अघोरी निर्भयता, अलिप्तता आणि सर्व अस्तित्वाच्या एकतेबद्दल एक आकर्षक दृष्टिकोन देतात.

समाजसेवेतही सहभागी

अघोरी साधूंचा समाजात सहज स्वीकार केला जात नाही. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये या संप्रदायाने समाजाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा प्रयत्न केला आहे. मिनिसोटा येथील मेडिकल कल्चरल अँड अँथ्रोपोलॉजिस्ट रॉन बारेट यांनी इमोरी रिपोर्टला दिलेल्या मुलाखतीत म्‍हटलं आहे की, " समाजाने बहिष्‍कृत केलेल्‍यांबरोबर अघोरी साधू काम करत आहेत. कुष्ठरोगाच्या रुग्णांसाठी हॉस्पिटल्सने एकप्रकारे स्मशानभूमींची जागा घेतली आहे. अघोरी या रोगाच्या भीतीवर विजय मिळवत आहेत. अघोरी समाजापासून वेगळे राहतात, असा साधारण समज आहे. मात्र काही अघोरी साधू फोन आणि सार्वजनिक वाहतुकीचाही वापर करतात. याशिवाय काही अघोरी साधू सार्वजनिक स्थळी जाताना कपडे घालून सामाजिक संकेताचे पालनही करतात.

कुंभमेळ्यात बहुतांश अघोरी साधू स्‍वयंघोषित

अघोरी रीतीचे योग्य पद्धतीने पालन करणारे खूपच कमी लोक आहेत, यावर मॅलिंसन आणि ठक्कर या दोघांचेही एकमत आहे. मॅलिंसन आणि ठक्कर यांच्‍या मते कुंभमेळ्यात स्‍वत:ला अघोरी साधू म्‍हणणारे बहुतांश स्वयंघोषित अघोरी असतात. त्यांनी कधीच कुठल्याच प्रकारची दिक्षा घेतलेली नसते. तसंच काही जण तर अघोरी साधूंप्रमाणे वेश घेऊन पर्यटकांचं मनोरंजन करतात. संगमात स्नान करण्यासाठी आलेले भाविक त्यांना खाद्‍य पदार्थांबरोबरच पैसेही देतात. मात्र, "अघोरी कुणाकडूनही पैसे घेत नाहीत आणि सर्वांच्या कल्याणासाठी प्रार्थना करतात. कुणी संतती प्राप्तीसाठी आशीर्वाद मागतोय की घर बांधण्यासाठी, याची ते पर्वा करत नाहीत," असे ठक्कर मानतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news