

देहरादून : पुढारी वृत्तसेवा :
१३ जानेवारीच्या पौष पैर्णिमा तिथीने सुरू झालेल्या महाकुंभाचे आज महाशिवरात्री दिवशी समारोप होणार आहे. आज महाशिवरात्रीच्या दिवशी महाकुंभात लाखोंच्या संख्येने लोक आले आहेत. संगमात स्नान करण्यासाठी लोकांनी गर्दी केली आहे. अशी मान्यता आहे की, फाल्गुन कृष्ण पक्ष च्या चतुर्दशी तिथीवर भगवान शंकर आणि पार्वतीचा विवाहसोहळा संपन्न झाला होता. याच दिवशी शिवशंकराने शिवलिंगाचे रूप धारण केले होते. त्यामुळे या दिवशीच्या महाकुंभातील स्नानाला विशेष महत्व प्रात्प झाले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, आज सकाळी ६ वाजेपर्यंत ४१ लाख लाकांनी गंगा नदीत पवित्र स्नानाची पर्वणी साधली आहे. या स्नानासोबत प्रयागराजमधील यंदाच्या महाकुंभाचा समारोप होणार आहे. अशावेळी लाखो लोकांना हा प्रश्न पडला आहे की, पुढचा कुंभमेळा केंव्हा आणि कुठे भरणार? (Ardh Kumbh 2027)
प्रयागराजच्या महाकुंभाच्या समाप्तीनंतर पुढचा महाकुंभ हा हरिव्दारच्या गंगेच्या किणाऱ्यावर भरणार आहे. हा कुंभमेळा दोन वर्षात २०२७ साली लागणार आहे. त्याला अर्धकुंभ २०२७ च्या नावे ओळखले जाणार आहे. त्यासाठी आतापासूनच उत्तराखंड सरकारने तयारीला सुरूवात केली आहे. सरकारच्या आदेशावरून हरिव्दारच्या सरकारी अधिकाऱ्यांनी 'अर्धकुंभ २०२७' च्या नावे तयारीला सुरूवात केली आहे. त्या संदर्भात नुकतीच एक बैठक संपन्न झाली.
बैठकीनंतर आज पोलीस महानिरीक्षक गढवाल राजीव स्वरूप म्हणाले की, "अर्धकुंभ २०२७" च्या तयारीला सुरूवात झाली आहे. ज्याचे गृह विभागाने प्रेझेंटेशन केले आहे. या कुंभमेळ्यासाठी पार्किंगची व्यवस्थाही कशी असणार आहे. गर्दीचे नियंत्रण कसे करण्यात येणार आहे. या विषयीची माहिती देण्यात आली. सोबतच याचे सादरीकरणही करण्यात आले.
'अर्धकुंभ २०२७' च्या तयारीवर आयुक्त गढवाल विनय शंकर पांडे यांनी सांगितले की, मुख्यमंत्र्यांनी या विषयीचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. प्रत्येक पातळीवर याची तयारी करण्यात यावी. हा मेळावा भव्य, दिव्य आणि सुरक्षित असायला हवा. येणाऱ्या प्रत्येक भाविकाला चांगल्या सुविधा मिळायला हव्यात. येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण होउ नये. यावर त्यांनी भर दिला आहे. लवकरच मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली सर्व विभागांच्या प्रमुखांची बैठक संपन्न होणार आहे. त्यावरून पुढचा २०२७ रोजीच्या कुंभाच्या तयारीला सुरूवात झाली आहे. हा 'अर्ध महाकुंभ २०२७' भव्य, दिव्य आणि सुरक्षित असणार आहे.