

नवी दिल्ली : दिवाळीच्या काळात दिल्लीत न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन झाल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकारसह दिल्ली पोलिसांना चांगलेच फटकारले आहे. फटाक्यांवरील बंदीच्या कडक अंमलबजावणीसाठी काय कारवाई केली, असा प्रश्न विचारला आहे. तसेच पुढील वर्षी दिवाळीत फटाक्यांवर बंदी घालणाऱ्या आदेशांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी काहीतरी केले पाहिजे, असेही न्यायालयाने म्हटले आहे. बंदीचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध परिसर सील करण्यासारख्या कठोर कारवाईची गरज असल्याचेही न्यायालयाने म्हटले.
दरम्यान, या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली सरकार आणि पोलिस आयुक्तांकडून फटाक्यांवर बंदीची अंमलबजावणी लागू करण्यासाठी काय पावले उचलली आहेत, यावर पुढच्या आठवडाभरात उत्तर मागितले आहे. १४ नोव्हेंबरला या बाबतीत पुन्हा सुनावणी होणार आहे. यावर्षी दिल्लीतील फटाक्यावरील बंदी कडक वाटत नव्हती, उलट वातावरण असे होते की जणू फटाक्यांवर बंदी नाहीच, असेही निरीक्षण न्यायालयाने काही माध्यम अहवालांच्या हवाल्याने नोंदवले. सर्वोच्च न्यायालयाने पंजाब आणि हरियाणा राज्य सरकारला ऑक्टोबरच्या शेवटच्या १० दिवसांमध्ये शेतांना आग लागणे आणि शेतातील पराली जाळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाल्याबद्दलही उत्तर दाखल करण्यास सांगितले आहे.
दिल्लीत प्रदूषणाची पातळी सातत्याने वाढत आहे. सोमवारी सलग दुसऱ्या दिवशी दिल्लीची हवा गंभीर श्रेणीत नोंदवण्यात आली. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार सोमवारी सकाळी दिल्लीतील अनेक भागात हवा गुणवत्ता निर्देशांक ४०० च्या पुढे नोंदवण्यात आला. पुढील ६ दिवस अशाच प्रकारचे प्रदूषण दिल्लीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे श्वसनाशी संबंधित आजारांमध्येही वाढ होऊ शकते. प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिकांनी काळजी घेण्याची गरज असल्याचे मत डॉक्टरांनी व्यक्त केले.