

पुढारी ऑनलाईन डेस्क : संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आज शुक्रवार (दि.३१) पासून सुरु होत आहे. याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज संसद परिसरात संबोधित केले. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आम्ही देशवासीयांच्या आशा आणि आकांक्षा पूर्ण करू, अशी मला आशा आहे, असे पीएम मोदी म्हणाले.
"अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी, मी संपत्ती आणि समृद्धीची देवता माँ लक्ष्मीला नमन करतो. आई लक्ष्मी आम्हाला समृद्धी आणि कल्याण देते. देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यमवर्गीयांवर माँ लक्ष्मीची विशेष कृपा राहो, अशी मी प्रार्थना करतो," असे पीएम मोदी म्हणाले.
''माझ्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे. मी आत्मविश्वासाने सांगू शकतो की २०४७ मध्ये जेव्हा भारत स्वातंत्र्याची १०० वर्षे पूर्ण करेल, तेव्हा भारत विकसित भारताचे उद्दिष्ट पूर्ण करेल आणि हा अर्थसंकल्प राष्ट्राला नवीन ऊर्जा आणि आशा देईल." असे पीएम मोदी यांनी सांगितले.
''आपल्या प्रजासत्ताकाला ७५ वर्षे पूर्ण झाली आहेत आणि हा देशातील प्रत्येक नागरिकासाठी गौरवाचा क्षण आहे. लोकशाही जगात भारताचे या सामर्थ्याला एक विशेष स्थान आहे. नावीन्यपूर्ण, समावेशक आणि गुंतवणूक हे आपल्या आर्थिक उलाढालीच्या रोडमॅपचे आधार राहिले आहेत. या अधिवेशनात नेहमीप्रमाणे अनेक ऐतिहासिक विधेयकांवर चर्चा होईल आणि व्यापक विचारमंथनासह राष्ट्राला बळकटी देणारे कायदे बनतील'', अशी आशा पीएम मोदी यांनी व्यक्त केली.
विशेषतः नारीशक्तीचा सन्मान पुन्हा स्थापित करणे, प्रत्येक महिलेला पंथ-संप्रदाय भेदभावापासून मुक्त होऊन सन्माननीय जीवन आणि समान अधिकार मिळावेत याची खात्री देण्याच्या दिशेने या अधिवेशनात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले जातील, असे पीएम मोदी यांनी सांगितले.