

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याची जय्यत तयारी सुरु आहे. १३ जानेवारीपासून महाकुंभमेळ्यास प्रारंभ हाेईल. देशभरातील भाविकांना गंगा यमुनेच्या संगमावर पवित्र स्नान करण्याची ओढ लागली आहे. तब्बल ४० काेटी भाविक महाकुंभमेळ्याच्या कालावधीत प्रयागराजला भेट देतील असा अंदाजही व्यक्त हाेत आहे. या महाकुंभमेळ्यामध्ये सर्वाधिक गूढ व्यक्तिमत्व म्हणजे नागा साधू , महाकुंभ व्यतिरिक्त अन्यवेळी या साधूंचे दर्शन दर्मिळ, इतरवेळी या साधूंचे वास्तव्य हिमालयात. त्यामुळे साधूंभोवती कमालीचे गूढ तयार झालेले असते. याच नागा साधूंच्या वैशिष्ट्याबाबत 'आजतक'शी ‘मणिराज पूरी’ या नागा साधूंनी सविस्तर माहिती दिली.
नग्न अवतार, अघोरी अनुष्ठान, अंगावर स्मशानातील राख फासणे, हिमालायाच्या कडकाक्याची थंडीतही वस्त्रांविना राहणे, यामुळे प्रत्येकाला त्यांच्याविषयी जाणून घेण्याचे कुतूहूल असते. नागा साधू होणे हे कोणाचेही काम नाही. पराकाेटीची शारीरिक सहनशीलता असणे यासाठी आवश्यक आहे. ऊन, वारा, पाऊस याचा त्यांच्या शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. यामुळे सर्वसामान्य भाविकांना त्यांच्याविषयी प्रचंड कुतुहल असते.
नागा साधू होण्यासाठी सर्वच गोष्टींचा त्याग करावा लागतो. नागा होणे यासाठी पहिल्यांदा आपल्या शरीरावरच अंत्यसंकार करावे लागतात, तसेच पिंडदानही करावे लागते. त्यानंतरच नागा होण्याची दिक्षा दिली जाते. हा विधी म्हणजे आपल्या कामवासनांवर नियंत्रण मिळवणे, पण याविषयी सार्वजनिक ठिकाणी बोलले किंवा सांगितले जात नाही. हे नांगाचे रहस्य आहे, याची जाहीर वाच्यता केली जात नाही.
नागा साधू होण्याची परंपरा ही आदी शंकराचार्यांच्या काळापासून चालत आलेली आहे. सनातन धर्माचे रक्षण करणे हे त्यांचे कर्तव्य आहे असे ते मानतात, त्यांना हत्यार चालवण्याचेही प्रशिक्षण दिले जाते कारण जर धर्मरक्षणासाठी लढण्याची जरी वेळ आली तर ते तयार असतात.
नागा होणे सोपी गोष्ट नाही. यासाठी सर्वप्रथम कुंटुंबाचा त्याग करावा लागतो. घर दार सोडणे, नाती तोडणे, त्यांच्याशी कोणताही संबध न ठेवणे, गुरुच्या सांगण्यानुसार जीवन व्यतित करणे, काम - क्रोध याच्यापलिकडे जाऊन ईश्वराची प्राप्ती करणे हेच आयुष्याचे ध्येय ठेवणे याचा स्वीकार करावा लागतो. ईश्वराची आराधाना हेच त्यांचे कर्तव्य असते.
नागा साधूंची पंरपरा कुठून सुरु झाली यावर अनेकांची अनेक मते आहेत; पण काही इतिहासकारांच्या मतानुसार सिंधू संस्कृतीतील मोहनजोदाडो येथे सापडलेल्या मुंद्रावर पशुपतीनाथांची प्रतिमा ही नग्न स्वरुपात आहे. जटाधारी असलेल्या या रुपातून हे लक्षात येते की त्या काळापासून नागांची परंपरा चालत आलेली आहे. काही इतिहासकारांच्या मते आदी शंकराचार्यांच्या काळापासून नागा साधुंचे आखाडे अस्तित्वात आहेत. महान योद्धा सिकंदर याच्याबरोबर प्रवास करणाऱ्या युनानी लोकांनी हिंदूस्तानात अशा नग्न फिरणाऱ्या साधूंचे दर्शन होत असल्याचे लिहून ठेवले आहे.
नागा साधू हे बहूतांशकरून हिमालयात केदारनाथ येथील आखाड्यांमध्ये, मंदिरात तर केदारखंड येथील जंगलातही काही साधू राहतात. तर काही साधू हे गुफांमध्येही वास्तव्य करतात. आखाड्यांच्या आदेशानुसार हे साधू पायीच भ्रमण करतात, यावेळी अनेक ठिकाणी झोपडी बांधून राहतात. पण अनेक साधू गुप्त ठिकाणी राहून तपस्या करतात.