पुढारी ऑनलाईन डेस्क
देशाच्या राजकीय वर्तुळात 'मगरमच्छ के आंसू' हा शब्द सध्या खूपच चर्चेत आहे. पण, हा शब्द कुठून आला? आणि खरंच मगर रडते का? हे पाहणं जिज्ञासूपणाचं लक्षण ठरेल. तर 'क्रोकोडाईल टिअर्स' ही संकल्पना मूळात इंग्रजीतून आली. त्याला 'मगरमच्छ के आंसू' म्हणत हिंदी भाषिकांनी स्वीकारली. मराठीत त्याला 'नक्राश्रू' असं म्हंटलं जातं. पण, या संकल्पनेचा अर्थ काय? तर, 'तुम्ही प्रामाणिक आहात, हे भासविण्यासाठी रडण्याची जी कृत्रिम नक्कल केली जाते, त्यालाच 'मगरमच्छ के आंसू', असं थोडक्यात म्हणता येईल. हा झाला सरधोपट अर्थ. पण मगर खरंच रडते का? शास्त्रीयदृष्ट्या काय खरं आहे? ते पाहू या…
वाचा ः पीएनबी घोटाळा : मेहुल चोक्सी अँटिग्वातून गायब
मगर रडते का, या प्रश्नाचं उत्तर शोधणं तसं फार कठीण काम. त्यामध्ये मगर ही पाण्यात जास्त काळ असते. त्यामुळे पाण्यात जास्त काळ राहणारी मगर रडते का, याच्यावर संशोधन करणं सोपं काम नाही. तरीही २००६ साली काही वैज्ञानिकांनी ७ मगरींना प्रशिक्षण दिलं. त्यांना त्यांच्या मूळच्या ठिकाणी सोडलं. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर पाळत ठेवली. त्या हालचाली टिपण्याचा प्रयत्न केला. या अभ्यासात असं लक्षात आलं की, त्या ७ मगरींपैकी ५ मगरी आपली शिकार खात असताना, त्यांच्या डोळ्यांतून पाणी येत होतं.
वाचा ः देशात राज्यनिहाय 'पर्याय' उभारण्याची गरज! भाजप नेते सुब्रमण्यम स्वामींचा पक्षाला घरचा आहेर
संशोधक असं सांगतात की, "मगर आपली शिकार चावून खाण्यापेक्षा गिळण्यावर जास्त भर देते. यावेळी तिच्या श्वासोच्छ्वास अतिवेगाने होऊ लागतो. त्यामुळे शिकार फस्त करत असताना फुरफुरते. त्याचा मोठा आवाज होत असतो. नेमकं याचवेळी मगरीच्या मेंदूतील काही विशिष्ट ग्रंथी उत्तेजित होतात. त्याच्या परिणाम मगरीच्या डोळ्यांवर होतो आणि मग मगरीच्या डोळ्यांतून पाणी येऊ लागते. थोडक्यात, मगर आपली शिकार फस्त करीत असताना तिच्या मेंदूतील विशिष्ट ग्रंथी उत्तेजित होतात. परिणामी, तिच्या डोळ्यांतून पाणी येते. आता 'मगरमच्छ के आंसू' या म्हणीचा विचार केला तर लोक असं समजतात की, मगर आपली शिकार खात असताना तिला एखाद्याचा जीव घेतल्यामुळे वाईट वाटते आणि ती रडते. मात्र, अशा म्हणण्याला कोणताही पुरावा नाही.