

पुढारी ऑनलाईन डेस्क : रतन टाटा (Ratan N. Tata) यांचे सावत्र बंधू नोएल टाटा (Noel Tata) यांची आज शुक्रवारी टाटा ट्रस्टच्या (Tata Trust) अध्यक्षपदी निवड करण्यात आली. रतन टाटा यांच्या निधनानंतर त्यांचा उत्तराधिकारी नेमण्यासाठी शुक्रवारी सकाळी टाटा ट्रस्टच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत टाटा समूहाची धुरा नोएल टाटा यांच्या खांद्यावर सोपवण्यात आली.
टाटा ट्रस्टमध्ये समावेश असलेल्या विविध ट्रस्टच्या विश्वस्तांची आज मुंबईत संयुक्त बैठक झाली. यावेळी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करण्यात आले. यावेळी टाटा ट्रस्ट्सचे अध्यक्ष रतन एन. टाटा यांनी केवळ टाटा समूहासाठीच नव्हे तर देशाच्या उभारणीसाठी दिलेल्या योगदानाचे आज स्मरण करण्यात आले, असे टाटा ट्रस्टने जारी केलेल्या निवदेनात म्हटले आहे. यावेळी नोएल नवल टाटा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
"माझ्या सहकारी विश्वस्तांनी माझ्यावर सोपवलेल्या जबाबदारीमुळे मी अत्यंत आदर व्यक्त करतो. मी रतन एन. टाटा आणि टाटा समूहाच्या संस्थापकांचा वारसा पुढे नेईन. एका शतकाहून अधिक काळापूर्वी स्थापन झालेले टाटा ट्रस्ट हे सामाजिक हिताचे काम करण्यासाठी एक अद्वितीय माध्यम आहे. या क्षणी, आम्ही आमच्या विकासात्मक आणि परोपकारी उपक्रमांना पुढे नेण्यासाठी आणि देशाच्या उभारणीत आमचे योगदान कायम राहावे, यासाठी मी स्वतःला पुन्हा समर्पित करतो.” असे नोएल टाटा यांनी म्हटले आहे.
ख्यातनाम उद्योजक आणि टाटा उद्योग समूहाचे अध्वर्यू रतन नवल टाटा (Ratan Tata) यांचे बुधवारी रात्री दीर्घ आजाराने वयाच्या ८६ व्या वर्षी निधन झाले. दरम्यान, रतन टाटा यांच्यानंतर त्यांचा उत्तराधिकारी म्हणून रतन टाटांचे सावत्र बंधू नोएल टाटा (Noel N. Tata) यांचे नाव चर्चेत होते. आज त्यांच्या टाटा ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून नोएल टाटा यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले.
नोएल एन. टाटा हे टाटा समुहाशी (Tata Group) गेल्या ४० वर्षांपासून जोडले गेले आहेत. सध्या ते टाटा समुहातील विविध कंपन्यांच्या मंडळावर काम करत आहेत. ते ट्रेंट, टाटा इंटरनॅशनल लिमिटेड, व्होल्टास आणि टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशनचे अध्यक्ष आणि टाटा स्टील आणि टायटन कंपनी लिमिटेडचे उपाध्यक्ष आहेत. नोएल टाटा हे सर रतन टाटा ट्रस्ट आणि सर दोराबजी टाटा ट्रस्ट मंडळावर विश्वस्त म्हणूनही काम करत आहेत. या वर्षाच्या सुरुवातीला, टाटा समूहाने नोएल टाटा यांच्या तीन मुलांची पाच संस्थांच्या मंडळावर नियुक्ती करण्यात आली होती. लिआ, माया आणि नेव्हिल यांना पाच ट्रस्टचे विश्वस्त बनवण्यात आले. ज्या सर दोराबजी टाटा ट्रस्ट आणि सर रतन टाटा ट्रस्ट, टाटा ट्रस्टमधील प्राथमिक संस्थांशी संलग्न आहेत.