

कोलकाता : केंद्रीय निवडणूक आयोग पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून सुमारे 58.8 लाख नावे वगळण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त आहे. पुढील वर्षी होणार्या विधानसभा निवडणुकीपूर्वी मतदार यादीतील या मोठ्या बदलामुळे राज्याचे संपूर्ण राजकीय चित्र बदलू शकते. या प्रक्रियेच्या व्यापकतेमुळे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि भाजप यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष सुरू झाला असून, दोन्ही बाजूंनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत.
गुरुवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या गणनेनुसार, 58,08,002 मतदारांची नावे वगळण्यासाठी चिन्हांकित करण्यात आली आहेत, असे सूत्रांनी सांगितले. यापूर्वीच्या आकडेवारीनुसार हा आकडा 58 लाख 8 हजार 202 होता. पुढील निवडणुकीपूर्वी मतदार यादी अद्ययावत करण्याच्या उद्देशाने ही एक मोठी शुद्धीकरण मोहीम असल्याचे अधिकार्यांनी म्हटले आहे.
निवडणूक आयोगाच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम बंगालच्या मतदार यादीत अनेक प्रकारच्या मतदारांना चिन्हांकित करण्यात आले आहे. यामध्ये सर्वात मोठा गट मृत मतदारांचा आहे. त्यानंतर नोंदणीकृत पत्त्यावर न सापडलेले, घर बदललेले आणि बनावट किंवा अस्पष्ट नोंदी असलेले मतदार यांचा समावेश आहे. ही नावे आता मसुदा मतदार यादीत दिसणार नाहीत.
पश्चिम बंगालमधील मतदार याद्यांचे विशेष सघन पुनरीक्षण 4 नोव्हेंबर रोजी सुरू झाले. याअंतर्गत बूथ स्तरावर अर्ज वाटप करण्यात आले. ही प्रक्रिया 11 डिसेंबरपर्यंत चालेल. निवडणूक आयोग 16 डिसेंबर रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्याची योजना आखत आहे, जेणेकरून नागरिकांना त्यांच्या नोंदी तपासता येतील आणि आक्षेप किंवा दुरुस्त्या सादर करता येतील.