पुढारी ऑनलाईन डेस्क : Murshidabad violence : "मुर्शिदाबाद हिंसाचारातील पीडित भयथीत आहेत. त्याना सुरक्षित वातावरण हवे आहे. मी लोकांना माझा फोन नंबर दिला आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांना माझी गरज असेल तेव्हा मला फोन करायला सांगितले आहे. या प्रकरणी मी केंद्र सरकारला अहवाल देणार आहे," अशी माहिती पश्चिम बंगालचे राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस यांनी आज (दि.१९) दिली. मुर्शिदाबाद हिंसाचारातील पीडितांना भेट दिल्यानंतर ते माध्यमांशी बोलत होते.
राज्यपाल बोस यांनी मालदा जिल्ह्यातील पर लालपूर येथील मदत छावणी शुक्रवारी भेट दिली होती. यानंतर आज त्यांनी मुर्शिदाबादमध्ये वक्फ (सुधारणा) कायद्याच्या विरोधात सुरू झालेल्या निदर्शनादरम्यान उसळलेल्या हिंसाचारातील पीडितांची भेट घेतली. यानंतर बोलताना ते म्हणाले की, मुर्शिदाबाद हिंसाचारातील पीडितांनासुरक्षिततेची भावना हवी आहे. त्याचबरोबर त्यांच्या इतर काही सूचना आणि मागण्या आहेत. हे सर्व विचारात घेतले जाईल. मी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे हे प्रकरण योग्य कृतीसाठी मांडणार आहे. मी याचा पाठपुरावा करीन. मी त्यांना थेट माझ्याशी संवाद साधण्यासाठी सांगितले आहे. त्यांना माझा फोन नंबरही देण्यात आला आहे. आम्ही त्यांच्या संपर्कात राहू. निश्चितच प्रभावी आणि सक्रिय पावले उचलली जातील"
राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजय रहाटकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने आज मुर्शिदाबादमधील हिंसाचारग्रस्त भागाला भेट दिली. "पीडितांनी भोगलेले दुःख अमानवी आहे. त्या दुःखाचे वर्णन करण्यासाठी त्यांच्याकडे शब्द नाहीत. ते नि:शब्द आहेत. त्यांच्या वेदना व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्दच नाहीत. आम्ही त्यांच्या मागण्या सरकारसमोर मांडणार आहोत.या प्रकरणी केंद्र सरकारकडे अहवाल सादर केला जाईल," असे विजया राहाटकर यांनी स्पष्ट केले.