

पुढारी ऑनलाईन डेस्क: काँग्रेस नेत्या आणि वायनाड येथील खासदार प्रियांका गांधी-वधेरा यांनी नुकतेच मल्याळम भाषा शिकण्यासाठी क्लास लावला असल्याची माहिती दिली. प्रियांका या वायनाडच्या खासदार आहेत. मल्य़ाळम ही तेथील स्थानिक भाषा आहे. त्यामुळे स्थानिकांनी सहज संवाद साधता यावा म्हणून त्यांनी हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे. (Priyanka Gandhi learning Malayalam)
एका शिक्षकाच्या मदतीने प्रियांका मल्याळम भाषा आत्मसात करत आहेत. नुकतेच प्रियांका गांधी यांनी वायनाड दौऱ्यात वडक्कनाड येथे एका सांस्कृतिक केंद्राचे उद्घाटन केले. यावेळी त्यांनी त्यांच्या या मल्याळम शिकण्याच्या प्रयत्नांची माहिती दिली.
खासदार प्रियांका गांधी म्हणाल्या की, “माझ्या निवडणूक प्रचारादरम्यान मी माजी मुख्यमंत्री ए. के. अँटनी यांच्याशी चर्चा केली. तेव्हा त्यांनी मल्याळम शिकणे गरजेचे असल्याचा सल्ला दिला. मला हे सांगताना आनंद होत आहे की मी एक शिक्षक शोधला आहे आणि आता मी मल्याळम भाषेत थोडेसे बोलू शकते.
प्रियांका गांधींना इंग्रजी, हिंदीसह फ्रेंच आणि इटालियन या भाषाही येतात. वायनाडमधील पल्लीकन्नू चर्चला भेट दिलेल्या शिष्टमंडळातील ख्रिस्ती पुरोहितांशी त्यांनी फ्रेंच आणि इटालियन भाषेत संवाद साधला होता.
नोव्हेंबर 2024 मध्ये जेव्हा पोटनिवडणुकीसाठी प्रियांका गांधी कामाला लागल्या होत्या. तेव्हापासूनच त्यांनी मल्याळम भाषा शिकण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. दररोज युडीएफ कामगारांकडून त्या मल्याळम भाषेतील शब्द शिकत होत्या. आता मात्र त्यांनी या भाषेत पारंगत होण्यासाठी शिक्षकाची शिकवणीच लावली आहे.
शुक्रवारी वायनाड जिल्ह्यातील एडवाका पंचायत येथे उभारलेल्या ‘स्मृती मंडपम्’च्या उद्घाटनप्रसंगी बोलताना त्या म्हणाल्या, सीमेवरील जवानांचे बलिदान आपले स्वातंत्र्य जपते. जे आजकाल सर्वांना सहज मिळाले आहे, असे वाटते. दरम्यान, एडवाका पंचायत ‘शून्य कचरा पंचायत’ म्हणून घोषित करण्यात आली आहे त्याबद्दलही प्रियांका गांधींनी अभिनंदन केले.
प्रियांका गांधी यांनी डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या वायनाड लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत मोठ्या फरकाने विजय मिळवला. तत्पूर्वी या जागेवरून त्यांचे बंधू आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी निवडून आले होते.
तथापि, राहुल गांधी यांनी अमेठीतूनही विजय मिळवला होता. त्यामुळे त्यांना दोन्ही पैकी एक जागा सोडावी लागणार होती. राहुल यांनी वायनाड जागा सोडली. त्यांच्या राजीनाम्यानंतर येथून प्रियांका गांधी यांचा अर्ज दाखल करण्यात आला होता.