महाराष्ट्रात अनेक कर्तबगार पुरुष होऊन गेले. त्यांच्यावर तुकाराम महाराजांचा आणि वारकरी संप्रदायाचा प्रभाव होता. कोणी सामाजिक, तर कोणी राजकीय क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. काही कला क्षेत्रातील लोक आहेत. काही साहित्य क्षेत्रातील लोक आहेत. त्यात धार्मिक क्षेत्रातील लोक असणारच. वेगळ्या पद्धतीने आपल्याला याचा विचार करता येईल. जे हे अभंग आहेत ते प्रकाशित झालेले आहेत. त्यावर अनेकांनी संशोधन केलं आणि अभ्यास केला. याच्या शुद्ध प्रती काढण्याचा लोकांनी प्रयत्न केला. त्यांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला. याचा दुसर्या भाषांमध्ये अनुवाद होत गेला. नेमकी ही प्रक्रिया कशी घडत गेली, हे आपण पाहू शकतो. एक आपल्याला सरळ-सरळ चित्रं दिसतं की, जेव्हा ब्रिटिश राजवट भारतात आली, तेव्हा काही मंडळी असे होते ते राजवटीमधले नियम पाळायचे, तर काहींचे वेगळे उद्दिष्ट होते. त्या राजवटीबरोबर ख्रिस्ती मिशनरी आले. त्यांना असं वाटत होतं, इथल्या लोकांचं धर्मांतर करून त्यांना ख्रिश्चन बनवावे. अशी वेगवेगळ्या देशांची मिशन्स भारतात आली. अमेरिकन मिशन, जर्मन मिशन, ब्रिटिशांचं मिशन अशा वेगवेगळ्या लोकांची मिशन्सही आली. त्यांनी त्यांच्या पद्धतीने प्रयत्न केले. पुण्यातही असे काही लोक आले. महात्मा जोतिराव फुले जेव्हा समाजकार्य करू लागले आणि परिस्थितीचे अवलोकन करायला लागले तेव्हा त्यांचा अशा प्रकारच्या मिशनरी लोकांशी संबंध आला. ही मिशनरी मंडळी काय करायची, तर इथल्या भाषेचा अभ्यास करायची आणि मराठीतून आपल्या इथल्या लोकांशी संवाद साधण्याचा प्रयत्न करायची. त्यांचा धर्म मराठी भाषेत सांगण्याचा प्रयत्न करायचे. जिथे यात्रा असतील तिथे जाऊन ते रस्त्यावर बिनधास्त न घाबरता कोणाला, कुठलेही दडपण न घेता धार्मिक प्रचार करायचे, अशी त्यांची एक मोहीमच होती.
मरे मिचेलसाहेबांनी ते करायचा प्रयत्न केला. काही पुस्तके लिहिली पंढरीच्या वारीबद्दल… इथल्या लोकांवर संतांचा खूप प्रभाव आहे, हे त्यांच्या लक्षात आलं. त्यांच्यावर तुकाराम महाराजांच्या साहित्याचा खूप प्रभाव आहे. तुकाराम महाराजांनी जे माध्यम वापरलं ते त्यांनी वापरलं. आपण अभंग करायला हवे, असे त्यांना वाटले. म्हणून मरे मिचेल यांनी चक्क मराठीमध्ये अभंगरचना केली. म्हणजे ख्रिश्चन धर्मच पण तो सांगायचा मराठीतूनच… तो कसा सांगायचा, तर तो तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या भाषेतून… ही मंडळी धर्माचा प्रचार करू इच्छित होते. साहजिकपणे इथल्या लोकांना वाटलं की, आपण जर त्यांना प्रतिशह द्यायचा असेल, आपल्यालाही काहीतरी करावं लागेल, तर काय करण्याची गरज आहे? बाळशास्त्री जांभेकर यांनी 'ज्ञानेश्वरी' हा ग्रंथ पहिल्यांदा छापला. आपणही काहीतरी करायला हवे, यासाठी त्यांनी हे कार्य केले. मग, संतसाहित्य प्रकाशित करण्यासाठी अनेक लोक पुढे आले. 1840 नंतर ही प्रक्रिया सुरू झाली. 1870 ते 1880 पर्यंत खूप लोक पुढे आले की, ज्यांनी तुकाराम महाराजांच्या अभंगांच्या वेगवेगळ्या आवृत्त्या छापल्या. लोकांपर्यंत ते पोहोचवलं. त्यामुळे त्याचा नक्कीच परिणाम झाला.
1857 ते 58 च्यादरम्यान मुंबई विद्यापीठाची स्थापना जेव्हा झाली त्यावेळी शिक्षण खातं होतं. त्याला डिपार्टमेंट ऑफ इन्स्ट्रक्शन म्हणायचे. शिक्षण खात्याचे सचिव सर अलेक्झांडर ग्रँट होते. त्यांचा तत्त्वज्ञानाचा अभ्यास होता. इथून निवृत्त होऊन ते मायदेशी इंग्लंडला गेले. तेव्हा त्यांची ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीत अॅरिस्टॉटल चेअरवर नियुक्ती झाली. तेच तेव्हा मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यामुळे हा सगळा व्यवहार आणि विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाची आखणी त्यांनी केली. अनेक दिग्गजांनी त्यांच्याकडून शिक्षण घेतले. त्यांच्या असं लक्षात आलं की, तुकाराम महाराज हे प्रभावी कवी आहेत आणि म्हणून त्यांनी आणि त्यांच्या सहकार्यांनी असं ठरवलं की, तुकाराम महाराजांच्या गाथेची संशोधित आवृत्ती काढायची. ते खासगी प्रकाशकाला जमण्यासारखं नव्हतं, तर मग त्यांनी ठरवलं की, सरकारकडे आपण काहीतरी अनुदान मागूयात. मग, त्यांनी अर्ज केला, तर त्या अर्जाची शिफारससुद्धा गव्हर्नरकडे अलेक्झांडर ग्रँटसाहेबांनी केली आणि 24 हजार रुपये त्यावेळेला अनुदान दिलं. 1869 मध्ये 24 हजार रुपये ब्रिटिश सरकारने तुकाराम महाराजांच्या गाथेची आवृत्ती काढण्यासाठी दिले. त्या गाथेच्या आवृत्तीला स्वत: अलेक्झांडरसाहेबांनी प्रस्तावना लिहिलेली आहे. त्यांनी तुकोबांवर एक महत्त्वाचा लेख लिहिला. तो एका ठिकाणी निबंध म्हणून वाचला. एका प्रसिद्ध नियतकालिकात तो छापून आला. त्या लेखात ते म्हणतात की, तुकोबा हे महाराष्ट्राचे राष्ट्रकवी आहेत. जोपर्यंत महाराष्ट्रातील माणसाच्या मुखामध्ये तुकाराम महाराजांचे अभंग आहेत, तोपर्यंत इथे कोणीही धर्म सोडायला तयार होणार नाही…'
एवढी खात्री त्यांच्या बोलण्यात होती. वारकर्यांनी असं म्हटलं, तर तो त्याच्या अभिमानाचा आणि अस्मितेचा मुद्दा असतो. अलेक्झांडर हे महाराष्ट्र आणि भारतातले नव्हते. ते वारकरी नव्हते. त्यांचा संतसाहित्याशी संबंध नाही आणि त्यांचा धर्म दुसरा… ते सांगत होते मिशनरी लोकांना की, तुम्ही आपली शक्ती का वाया घालवता?
एवढा त्या काळातल्या लोकांवर तुकाराम महाराजांच्या अभंगांचा प्रभाव होता. तो त्यांच्याही लक्षात आला. त्यांनी छापलेली गाथा दोन भागांमध्ये उपलब्ध झाली. त्या गाथेच्या संपादनाचं काम दोन लोकांनी केलं. एक शंकर पांडुरंग पंडित जे अलेक्झांडर ग्रँटसोहबांचेच शिष्य होते. ते शासकीय नोकरीत होते. त्यांनी फार महत्त्वाची कामे केली. ते नगरचे जिल्हाधिकारी होते. ते वेदार्थ यत्न नियतकालिक चालवायचे. परकीय भाषांचे त्यांना ज्ञान होते. दुसरे म्हणजे विष्णुशास्त्री पंडित. ते संस्कृतचे पंडित आणि सुधारक होते. ते प्रार्थना समाजातले होते. त्यांनी स्त्रियांसाठी मोठे काम केले. या विद्वान म्हणून गणल्या गेलेल्या त्यांनी तुकाराम गाथेच्या संपादनाचं काम केलं. ग्रँटसाहेबांनी या कामावर देखरेख ठेवली. अशा पद्धतीने दोन भाग तुकाराम गाथेचे पुढे आले. महाराष्ट्रातला मराठीतला पहिला संशोधित ग्रंथ कुठला, तर ती तुकाराम गाथा होय. बाळशास्त्री जांभेकरांनी 'ज्ञानेश्वरी'बाबतीत हा प्रयत्न केला. पण, त्यांना तेवढ्या प्रती काढता आल्या नाहीत. त्यांनी जमलं तेवढं काम केलं. तुकाराम गाथेची ही मुंबई शासनाची प्रत याला पंडिती प्रत म्हटलं जातं. सतत तिची आवृत्ती छापली गेली. 1950 मध्ये भारत स्वतंत्र झाला होता. मुंबई राज्य होतं. तेव्हा तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनाची शताब्दी होती, तर मुंबई सरकारने असं ठरवलं की, ती साजरी करायची. मुंबई सरकारने जी तुकाराम गाथा छापली होती ती आता मिळत नाही. त्याची पुढची आवृत्ती छापायला सांगितली. त्यावेळेला पुरुषोत्तम मंगेश लाड हे एक अधिकारी होते. त्यांचा बौद्ध धर्माचा अभ्यास होता. त्यांच्यावर ते काम सोपविण्यात आलं आणि त्यांच्या वेळेला गाथा दोन भागांत छापली गेली. त्यांना सरकारकडून बाळासाहेब खरे यांनी सांगितलं की, तुम्ही नुसती गाथा छापली, हे योग्य आहेच. पण, आता तुकाराम महाराजांचे वेगळ्या द़ृष्टीने चरित्रही लिहा. ते लाड यांनी मान्य केलं. दुर्दैवाने त्यांच्याकडून ते चरित्र पूर्ण झालं नाही. त्यांचे निधन झाले. जेवढं चरित्र त्यांनी लिहिलं सरकारने त्यावेळेला प्रकाशित केलं.
हा तुकोबांचा प्रभाव. त्यांची गाथा अनेक लोकांनी आपल्याला कळली पाहिजे, याचा प्रयत्न केला. त्याचा अर्थ लावला पाहिजे, ती लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे. त्यात सरकारसुद्धा मागे नव्हतं. आजसुद्धा सरकारने छापलेली तुकाराम गाथेची आवृत्ती शासकीय फोटोझिंकोमध्ये मिळू शकते, तर इतकं महत्त्व हे आपल्या आजही तुकाराम गाथेला आहे. पंढरपूरला दरवर्षी संतांच्या पालख्या जातात. रस्ता लहान होत चालला आहे आणि वारकर्यांची संख्या वाढत चालली आहे. म्हणून तेव्हा पालखी महामार्ग काढण्याची संकल्पना पुढे आली. राज्य सरकारने रस्त्याचे रुंदीकरण केले. पण, आता केंद्रीय वाहतूक आणि दळणवळणमंत्री नितीन गडकरी यांनी हा पालखी महामार्ग फार मोठा झाला पाहिजे, यासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. आता ते काम सुरू झालं आहे. तुकाराम महाराज, त्यांचा वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्रामधला धार्मिक आणि सांस्कृतिक विचारातला मुख्य प्रवाह आहे. केवळ मराठी संस्कृतीचा विचार करताना याच मार्गाने जायला हवं. आज वेगवेगळ्या प्रकारच्या मंडळींचा आणि सरकारचा वारकरी संप्रदायाशी संबंध आहे. तो यापुढेही अबाधित राहील.
– डॉ. सदानंद मोरे (लेखक माजी साहित्य संमेलनाध्यक्ष आणि संतसाहित्याचे अभ्यासक आहेत.)