Vrindavan Boat Tragedy : मथुरेतील वृंदावनमध्ये यमुना नदीत बोट उलटून १० पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता

शोधमोहिमेसाठी पथके तैनात, पंतप्रधान-मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त
Vrindavan Boat Tragedy : मथुरेतील वृंदावनमध्ये यमुना नदीत बोट उलटून १० पर्यटकांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
Published on
Updated on

मथुरा : मथुरेतील वृंदावन येथे यमुना नदीत पर्यटकांनी भरलेली नौका उलटल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या भीषण अपघातात आतापर्यंत १० जणांचा बुडून मृत्यू झाला असून, २२ पर्यटकांना सुखरूप वाचवण्यात यश आले आहे. अद्यापही अनेक जण बेपत्ता असून शोधमोहीम युद्धपातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

शुक्रवारी (दि. १०) दुपारी पावणे तीन वाजेच्या सुमारास बांके बिहारी मंदिरापासून अडीच किलोमीटर अंतरावर असलेल्या केशी घाटाजवळ हा अपघात झाला. नदीतील पुलाजवळ भाविकांनी भरलेली ही नौका अचानक उलटली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन आणि मदत व बचाव पथकांनी तातडीने धाव घेतली.

बचावकार्य सुरू; शोधमोहिमेसाठी पथके तैनात

मथुरेचे जिल्हाधिकारी चंद्र प्रकाश सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, यमुना नदीत शोधमोहीम सातत्याने सुरू असून गोताखोर बेपत्ता लोकांचा शोध घेत आहेत. जिल्हा प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी तळ ठोकून असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, या नौकेत ३० हून अधिक प्रवासी होते आणि हे सर्व पर्यटक पंजाबमधील लुधियाना येथून वृंदावन दर्शनासाठी आले होते.

पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडून शोक व्यक्त

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेची गंभीर दखल घेत मृतांच्या वारसां प्रती शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत. त्यांनी 'X' (ट्विटर) वर पोस्ट करत म्हटले की, "मथुरा येथील ही दुर्घटना अत्यंत दुःखद आणि हृदयद्रावक आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याचे आणि बचावकार्याला वेग देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत."

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही या घटनेबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे. "ज्यांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे, त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे. जखमींच्या लवकरात लवकर प्रकृती सुधारावी यासाठी मी प्रार्थना करतो," असे पंतप्रधानांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

अपघाताचे नेमके कारण काय?

प्रत्यक्षदर्शी गुलाब यांनी दिलेल्या माहितीनुसार, वेगवान वाऱ्यामुळे नौकेवरील नियंत्रण सुटले आणि ती पीपा पुलाला आदळून नदीत उलटली. दुसरीकडे, मथुरा ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सुरेश चंद्र रावत यांनी सांगितले की, नदीवरील पोंटून पुलाची अवस्था जर्जर झाली होती आणि एका एजन्सीद्वारे त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. दुरुस्तीच्या कामादरम्यानच ही दुर्घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

सध्या राज्य आपत्ती प्रतिसाद दल (SDRF) आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे (NDRF) पथक ५० हून अधिक स्थानिकांच्या मदतीने नदीपात्रात शोध घेत आहेत. वाचवण्यात आलेल्या २२ जणांना तातडीने रुग्णवाहिका आणि पोलीस वाहनांद्वारे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांच्या नातेवाईकांना योग्य नुकसान भरपाई देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिले आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news