

Virtual hearings shocker at Delhi court : दिल्लीतील तिस हजारी न्यायालयात (Tis Hazari Court) सुरू असलेल्या व्हर्च्युअल (अभासी) सुनावणीत अंतर्वस्त्रांवर हजर राहून, सिगारेटचे झुरके मारत आणि दारूचे घोट रिचवत सहभागी झालेल्या मोहम्मद इम्रान (वय ३२) या कुख्यात गुन्हेगाराला पोलिसांनी जुन्या मुस्तफाबादमधून अटक केली आहे. न्यायालयाच्या कर्मचाऱ्याने या प्रकरणी तक्रार दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, १६ आणि १७ सप्टेंबर रोजी उत्तर प्रदेशातील कुख्यात गुन्हेगार मोहम्मद इम्रान हा ‘अकिब अखलाक’ या खोट्या नावाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे वारंवार न्यायालयाच्या सुनावणीत सहभागी होत होता. यावेळी तो दारूचे घोट घेत आणि सिगारेटचे झुरके मारत असल्याचे निदर्शनास आले.न्यायालयाच्या अधिकाऱ्यांनी वारंवार सूचना देऊनही मोहम्मद इम्रान व्हर्च्युअल सुनावणी सोडण्यास तयार नव्हता. अखेर न्यायालयाने याची तक्रार पोलिसांकडे केली.
उपायुक्त (उत्तर) राजा बांठिया यांनी माहिती दिली की, पोलिसांनी तांत्रिक तपास केला. यात IP पत्ते (IP Addresses) आणि कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) यांचे विश्लेषण करण्यात आले. मात्र, आरोपीने बनावट ईमेल खाती वापरली होती आणि तो वारंवार ठिकाण बदलत होता, त्यामुळे तपास अधिक कठीण झाला.अखेर मॅन्युअल तपासणी आणि स्थानिक गुप्तहेरांच्या मदतीने जुन्या मुस्तफाबादमधील चमन पार्क येथे मोहम्मद इम्रानला अटक करण्यात आली.
पोलिसांच्या चौकशीत इम्रानने संबंधित तारखांना न्यायालयाच्या व्हर्च्युअल सत्रांमध्ये सहभागी झाल्याचे कबूल केले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाबाहेरील एका व्यक्तीने त्याला व्हिडिओ कॉन्फरन्सिंग अॅपबद्दल माहिती दिली होती आणि मीटिंग आयडीही दिला होता.त्याने सांगितले की, ‘कुतूहलापोटी’ तो नियमितपणे खोट्या नावाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणीत सहभागी होत होता. अखेर, अंतर्वस्त्रांवर सिगारेट ओढत आणि दारूचे घोट घेत तो न्यायालयाच्या व्हर्च्युअल सुनावणीत सहभागी झाल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी स्पष्ट केले की, मोहम्मद इम्रान पूर्वी मेकॅनिक म्हणून काम करत होता. मात्र, दारू आणि अंमली पदार्थांच्या व्यसनामुळे तो गुन्हेगारीकडे वळला.व्यसने पूर्ण करण्यासाठी आणि झटपट पैसे मिळवण्यासाठी त्याने चोऱ्या सुरू केल्या. सप्टेंबर २०२१ मध्ये तो तुरुंगातून बाहेर आला असला, तरी त्याने पुन्हा चोऱ्या सुरू केल्या.इम्रान हा कुख्यात गुन्हेगार असून, दिल्लीतील विविध पोलीस ठाण्यांमध्ये त्याच्यावर चोरी, सोनसाखळी चोरी आणि बेकायदेशीर शस्त्र बाळगणे यासह ५० हून अधिक गुन्हे दाखल आहेत. सध्या त्याच्यावर अनेक प्रकरणांमध्ये खटले सुरू आहेत.