

चिरांग (आसाम); वृत्तसंस्था : आसाम-भूतान सीमेलगत असलेल्या चिरांग जिल्ह्यात अतिक्रमण हटाव मोहिमेच्या पार्श्वभूमीवर सुरू झालेला वाद हिंसक स्वरूपात बदलला असून, घेराव, दगडफेक आणि पोलिसांच्या गोळीबारात अनेकजण जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. सलग दुसर्या दिवशीही या भागात तणावपूर्ण परिस्थिती कायम आहे.
या घटनेची सुरुवात रूनीखाता वन विभाग कार्यालयाबाहेर झाली. आरक्षित वन क्षेत्रातील अतिक्रमणाच्या आरोपावरून काही लोकांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी मोठ्या संख्येने ग्रामस्थ गुरुवारी रात्री उशिरा कार्यालयाबाहेर जमले आणि त्यांनी घेराव घातला. आंदोलनात मोठ्या प्रमाणावर महिलाही सहभागी झाल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ लागल्याने वन कर्मचार्यांनी जमाव पांगवण्यासाठी लाठीमार केला. या कारवाईत एका तरुणीला गंभीर दुखापत झाली.
ती बातमी पसरताच संतप्त जमाव अधिक आक्रमक झाला. शुक्रवारी सकाळी पुन्हा मोठ्या संख्येने आंदोलक एकत्र आले. ग्रामस्थ आणि सुरक्षा दलांमध्ये वाद वाढत गेला आणि अखेर दोन्ही बाजूंमध्ये झटापट झाली. यावेळी आंदोलकांनी दगडफेक केल्यामुळे अनेक पोलिस जखमी झाले. परिस्थिती अधिकच बिघडत असल्याचे पाहून पोलिसांनी गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे. या कारवाईत अनेकजण जखमी झाले असून, काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.