

नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने उच्च शिक्षण विभागाचे विद्यमान सचिव विनीत जोशी यांना अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे. त्यांची विद्यापीठ अनुदान आयोगाचे (यूजीसी) अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. युजीसीचे माजी अध्यक्ष जगदीश कुमार यांच्या निवृत्तीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. जगदीश कुमार यांनी फेब्रुवारी २०२२ पासून यूजीसीचे अध्यक्ष म्हणून कार्य केले. पूर्णवेळ अध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत किंवा पुढील आदेश जारी होईपर्यंत विनीत जोशी यूजीसी अध्यक्ष म्हणून कर्तव्य बजावतील.
विनीत जोशी १९९२ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) अधिकारी आहेत. त्यांचा जन्म २ नोव्हेंबर १९६८ रोजी उत्तर प्रदेशात झाला. ते मणिपूर केडरच्या बॅचचे आहेत आणि त्यांनी देशाच्या शिक्षण व्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. जुलै २०२३ ते डिसेंबर २०२४ पर्यंत त्यांनी मणिपूर सरकारमध्ये मुख्य सचिव म्हणून काम पाहिले. त्यानंतर १६ जानेवारी २०२४ रोजी त्यांना केंद्र सरकारमध्ये उच्च शिक्षण सचिव म्हणून नियुक्त करण्यात आले. विनीत जोशी यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) कानपूर येथून मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली आहे. विनीत जोशी डिसेंबर २०१९ ते नोव्हेंबर २०२० पर्यंत राष्ट्रीय चाचणी संस्थेचे (एनटीए) महासंचालक होते. ते केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे (सीबीएसई) अध्यक्षही राहिले आहेत.