नवी दिल्ली ः माझा विनय हा लहानपणासून खोडकर होता. लग्नाच्या आदल्या दिवशी पहलगाम दहशतवादी हल्ल्यात माझ्या लेकरास वीरमरण झाले. तो आता फक्त आठवणीत आहे. तरीही मनात एक आशा आहे. तो मला कधीतरी नक्की भेटण्यास येईल, अशी भावना दहशतवादी हल्ल्यात बळी गेलेले लेफ्टनंट विनय नरवाल यांच्या मातोश्री आशा नरवाल यांनी व्यक्त केले.
22 एप्रील रोजी झालेल्या हल्ल्यात विनय यांना प्राण गमवावा लागला. मातृदिनानिमित्त काही वृत्तसंस्थांनी नरवाल यांच्या आईची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी आशा यांच्या भावनांना बांध फुटला. बोलताना त्यांच्या तोडांतून शब्दही फुटत नव्हते. भावनाविवश होवून बोलताना त्या म्हणाल्या की, विनयच्या सगळ्या आठवणी माझ्या हृदयात खोलवर आहेत. प्रत्येक गोष्टीत तो आठवतो. विनय लहानपणी खूप खट्याळ होता. तो जेव्हा कधी सैनिकांना बघायचा, तेव्हा धावत जाऊन त्यांना सॅल्यूट करायचा. विचारलं की का? तर म्हणायचा, ‘मला खूप आवडतं.’ त्याला लहानपणापासून देशसेवेचं वेड होतं. झोपताना तो माझ्यावर पाय ठेवायचा आणि लाडक्या बहिणीला म्हणायचा, ‘मम्मी आधी माझी आहे, नंतर तुझी’ - मग म्हणायचा, ‘आर्धी मम्मी माझी, आर्धी तुझी.’ तो सर्वगुणसंपन्न होता. इंजिनियरिंग केल्यानंतर अनेकांनी त्याला खासगी नोकरी करायला सांगितलं, पण त्याने ठामपणे नौदलात जाण्याचा निर्णय घेतला. एकदा आजारी असूनही, निवड प्रक्रियेच्या दुसर्या टप्प्यासाठी गेला आणि यशस्वी झाला. माझ्या लेकाने जसं ठरवलं, तसं करून दाखवले, असा सार्थ अभिमान त्यांनी व्यक्त केला. 9 एप्रिलपासून लग्नाचं वातावरण सुरु झालं. 20 एप्रिलला टेंट्स काढून टाकले. आमच्या घरात इतकं आनंदाचं वातावरण होतं की सावरत नव्हतो. आणि अचानक सगळं जगच उलटंपालटं झाल्याचे त्यांनी सदगदीत होवून सांगितले.
21 एप्रिलच्या रात्री साडेआठ-नऊच्या सुमारास आईचा शेवटचा फोन झाला विनयशी. त्याने सांगितलं की ते दोघं - तो आणि हिमांशी - जेवण करून हॉटेलकडे जात होते. मी त्याला सांगितलं, ‘फक्त हॉटेलमध्येच जा, इकडेतिकडे जाऊ नकोस.’ दुसर्या दिवशी फोन करायचा विचार केला पण राहून गेलं आणि आता तो आवाज पुन्हा कधी ऐकायला मिळणार नाही.