

नवी दिल्ली : भारताची बाजू जगभरात मांडण्यासाठी जाणाऱ्या शिष्टमंडळांना परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री माहिती देणार आहेत. परराष्ट्र सचिव दोन टप्प्यात या शिष्टमंडळांना माहिती देणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री २० मे रोजी संजय झा, कनिमोझी आणि श्रीकांत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाला माहिती देतील. त्यानंतर, उर्वरित ४ शिष्टमंडळांना २३ मे रोजी माहिती देणार आहेत. २० मे रोजी होणार असलेल्या चर्चेनंतर संबंधित शिष्टमंडळ २१ ते २३ मे दरम्यान परदेश दौऱ्यावर असतील तर २३ मी रोजी होणार असलेल्या चर्चेनंतर ४ शिष्टमंडळ २३ मे ते २५ मे दरम्यान विविध देशांना भेट देतील.
दहशतवादाचे आश्रयस्थान बनलेल्या पाकिस्तानचा पर्दाफाश करण्यासाठी आणि ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी, भारत आता जगातील अनेक देशांमध्ये खासदारांचे सर्वपक्षीय शिष्टमंडळ पाठवत आहे. ७ शिष्टमंडळे जगातील ३२ देशांना भेट देतील आणि पाकिस्तान नेहमीच दहशतवादाला कसा प्रोत्साहन देत आहे हे स्पष्ट करतील.
या शिष्टमंडळांमध्ये विविध पक्षांच्या खासदारांचा समावेश करण्यात आला आहे. विदेश दौऱ्यापूर्वी आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर भारताची बाजू मांडण्यासंदर्भात परराष्ट्र सचिव विक्रम मिस्त्री या शिष्टमंडळांच्या प्रमुखांशी तसेच सदस्यांशी चर्चा करणार आहेत. साधारणपणे कुठल्या देशांसमोर बाजू कशी मांडावी याबाबत परराष्ट्र सचिव आणि शिष्टमंडळांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे.