

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री बिपाशा बासु हिची बहीण विजयता बासु सायबर फसवणुकीच्या मोठ्या जाळ्यात सापडली आहे. एका बनावट पार्सल मेसेजच्या माध्यमातून तिच्याकडून क्रेडिट कार्डची माहिती हेरून तब्बल 1.80 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही संपूर्ण घटना सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.
विजयता बासु यांनी सांगितल्याप्रमाणे, काही दिवसांपूर्वी त्यांना एका कुरिअर कंपनीच्या नावाने पार्सल डिलेव्हरीचा मेसेज आला होता. त्या मेसेजमध्ये लिहिले होते की, “आपले पार्सल डिलेव्हरीसाठी तयार आहे, पण तुमची माहिती द्या करा अन्यथा पार्सल परत जाईल.” त्यात एक लिंकही दिली होती.
विजयताने त्या लिंकवर क्लिक करून आपल्या क्रेडिट कार्डची माहिती भरली. काही तासांनी त्यांच्या मोबाईलवर फ्रान्समधील “Hyatt Regency Hotel” येथे रूम बुकिंग झाल्याचा मेसेज आला.
आश्चर्याची बाब म्हणजे, विजयताने कोणतेही बुकिंग केले नव्हते. तरीही त्यांच्या क्रेडिट कार्डवरून तब्बल 1.8 लाख रुपयांची रक्कम वळती झाली होती. लगेचच त्यांनी कार्ड ब्लॉक करण्यासाठी बँकेशी संपर्क साधला. त्यानंतर सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे.
सायबर विभागाच्या तपासानुसार, या फसवणुकीत सहभागी असलेले सायबर भामटे परदेशातून काम करत असावेत अशी शक्यता आहे. हे टोळी सदस्य लोकांना पार्सल डिलेव्हरी, KYC अपडेट, बँक खात्याची पडताळणी अशा नावाखाली लिंक पाठवतात आणि ती लिंक उघडताच तुमची वैयक्तिक आर्थिक माहिती त्यांच्या हाती लागते.
या घटनेनंतर पुन्हा एकदा नागरिकांना अनोळखी लिंकवर क्लिक न करण्याचा आणि OTP किंवा कार्ड माहिती कोणालाही न देण्याचा इशारा देण्यात आला आहे. सायबर पोलिसांनी सांगितले की, “आजकाल फसवणुकीचे तंत्र अत्यंत आधुनिक झाले आहे. त्यामुळे लोकांनी सावध राहणं अत्यंत गरजेचं आहे. अशा कोणत्याही मेसेजवर विश्वास ठेवू नका.”
विजयता बासु यांनीही आपल्या इन्स्टाग्रामवर याबाबत पोस्ट करत सर्वांना सावध केले आहे. त्यांनी म्हटलं आहे, “मी सुद्धा एक सामान्य नागरिक आहे. एका क्षणाच्या दुर्लक्षामुळे माझं नुकसान झालं. म्हणून तुमच्यापैकी कोणीही असा मेसेज आला तर लगेच तो Delete करा. कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका.”
सध्या ही तक्रार माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66(क) आणि 66(ड) अंतर्गत दाखल करण्यात आली असून तपास सुरू आहे. पोलिस लवकरच या सायबर टोळीचा शोध घेणार आहेत.