

नवी दिल्ली : प्रशासकीय सेवेतील अफाट आणि वैविध्यपूर्ण अनुभवांचे संचित केवळ स्वतःपुरते मर्यादित न ठेवता, ते साहित्याच्या माध्यमातून समाजासमोर येणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी जबाबदार व्यवस्थेतील अधिकाऱ्यांनी लिहिते होणे आवश्यक आहे, प्रशासनातील संवेदनशीलता जपण्यासाठी आणि कामाचा ताण हलका करण्यासाठी साहित्य हे एक उत्तम माध्यम आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी केले.
राजधानी दिल्लीत सरहद पुणे, मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र सदन, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय ऐतिहासिक साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी त्या बोलत होत्या. दरम्यान, चांगले लेखक होण्यासाठी आधी चांगले वाचक होणे आवश्यक आहे आणि तुम्ही अधिकारी पदापर्यंत येईपर्यंत तुम्ही बरंच वाचन केले. त्याअर्थी पहिला टप्पा पूर्ण केला आहे..त्यामुळे पुढच्या पिढ्यांसाठी तुमचे अनुभव आवर्जून लिहा, असे आवाहन त्यांनी अधिकाऱ्यांना केले.
समारोपीय कार्यक्रमाला व्यासपीठावर विजया रहाटकर यांच्यासह संमेलनाध्यक्षा तथा निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव लीना मेहंदळे, स्वागताध्यक्षा तथा सहमहालेखानियंत्रक सुप्रिया देवस्थळी, संमेलनाच्या निमंत्रक तथा महाराष्ट्र सदनच्या निवासी आयुक्त व सचिव आर. विमला, विशेष आयुक्त श्वेता सिंघल, मुख्य संयोजक सुषमा नहार, कार्यवाह प्रिती पगारिया आणि सहसंयोजक लेशपाल जवळगे उपस्थित होते.
यावेळी बोलताना विजया रहाटकर यांनी महिला अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे आणि त्यांच्यातील दडलेल्या साहित्यिक प्रतिभेचे विशेष कौतुक केले. त्या म्हणाल्या की, राजमाता जिजाऊ आणि महाराणी ताराराणी यांनी राज्यकारभाराचा जो आदर्श आणि धोरणीपणा दाखवला, त्याचाच वारसा आजच्या महिला अधिकारी समर्थपणे पुढे नेत आहेत. रोजच्या धावपळीच्या दिनचर्येत अधिकाऱ्यांना अनेक सामाजिक आणि आर्थिक संघर्षांना सामोरे जावे लागते. हे अनुभव जेव्हा कथा किंवा कवितेच्या रूपात कागदावर उतरतात, तेव्हा ते केवळ लेखन न राहता देशाच्या बदलाचे महत्त्वाचे दस्तऐवज ठरतात. आज आपण तंत्रज्ञान आणि आयटीच्या युगात वावरत असताना मानवी संवेदनांची साहित्याशी जोड असणे अधिक गरजेचे झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागातील प्रश्नांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी आपल्या लेखणीचा प्रभावी वापर करावा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी बहिणाबाई चौधरी आणि आचार्य अत्रे यांच्या साहित्याचा संदर्भ देत मराठी भाषेची थोरवी विषद केली.
विजया रहाटकर नाशिकच्या आठवणीत रमतात तेव्हा...
समारोपाचे भाषण करताना विजय राहटकर नाशिक मध्ये घालवलेला बालपण सांगताना भावुक झाल्या. माझे बालपण मला खूप आठवते. नाशिकच्या एका वाचनालयाजवळ माझं बालपण गेलं. वि. वा. शिरवाडकर यांच्या बंगल्यात फुलं आणायला आम्ही जायचो. आई मला आवर्जून रविवारी वाचनालयात पाठवायची कारण रविवारी तिथे साहित्यिक यायचे. माझा खूप चांगला अनुभव होता. पुढे माझ्या मुलींनी चांगली मराठी शिकावी, हा माझा आग्रह राहिला. पुढे मराठवाडा लेखिका साहित्य संमलेनाचे आयोजन केले होते, त्याच्या स्वागताध्यक्षपदी मी होते. तर वाचनालय आणि त्यातून मिळणाऱ्या साहित्यामुळे माझा साहित्याशी संबंध आला जो माझ्यासाठी मोठा ठेवा आहे, असे म्हणत त्या आठवणीत रमल्या.
संमेलनाध्यक्षा लीना मेहंदळे यांनी अधिकाऱ्यांना प्रोत्साहित करताना सांगितले की, प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना आपण चोवीस तास 'कॉल ऑन ड्युटी' असतो, मात्र या धावपळीत स्वतःमधील सर्जनशील माणूस जिवंत ठेवणे आवश्यक आहे. अधिकाऱ्यांनी संकोच सोडून लेखक आणि संवेदनशील नागरिक म्हणून व्यक्त व्हावे. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'सेल्फ सर्टिफिकेशन' धोरणाचे स्वागत करत प्रशासनातील आधुनिक बदलांचा आणि तंत्रज्ञानाचा, विशेषतः 'युनिकोड'चा प्रभावी वापर करण्याचे आवाहन उपस्थित अधिकाऱ्यांना केले. आर. विमला यांनी प्रशासकीय कर्तव्य आणि साहित्याची सेवा यांच्या संगमावर भाष्य केले. जेव्हा प्रशासकीय अनुभवाची जोड संवेदनशील लेखणीला मिळते तेव्हा समाजाकडे पाहण्याचा एक अधिक मानवी आणि न्यायपूर्ण दृष्टिकोन विकसित होतो. दरम्यान, यावेळी साहित्य संमेलन संयोजन आणि समन्वयासाठी सहकार्य करणारे अधिकारी कर्मचारी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला. या दोन दिवसीय साहित्य संमेलनामुळे प्रशासकीय जबाबदारी आणि सृजनशीलता यांचा एक उत्तम संगम पाहायला मिळाला.