

चेन्नई : तामिळनाडू विधानसभा निवडणूक २०२६ च्या निकालानंतर रंगलेल्या सत्तासंघर्षाला आता पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे. सुपरस्टार विजय यांच्या नेतृत्वाखालील 'तमिळगा वेत्री कझगम' (TVK) हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला असला तरी, बहुमताच्या आकड्यापासून ते काहीसे दूर होते. मात्र, ताज्या सूत्रांनुसार, डावे पक्ष (CPM, CPI) आणि विदुथलाई चिरूथईगल काची (VCK) यांनी विजय यांना पाठिंबा देण्याची तयारी दर्शवल्याने त्यांच्या मुख्यमंत्रीपदाचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे.
तामिळनाडू विधानसभेच्या एकूण २३४ जागांपैकी विजय यांच्या टीव्हीके पक्षाने १०८ जागांवर विजय मिळवून दणदणीत कामगिरी केली आहे. विशेष म्हणजे, विजय स्वतः दोन मतदारसंघांतून निवडून आले आहेत. नियमानुसार त्यांना एका जागेचा राजीनामा द्यावा लागणार असल्याने त्यांच्या पक्षाचे संख्याबळ १०७ होईल. एकूण आमदारांची संख्या २३३ गृहीत धरली तरी बहुमतासाठी ११८ या जादूई आकड्याची आवश्यकता आहे. टीव्हीकेला सध्या काँग्रेसच्या ५ आमदारांचा पाठिंबा आहे, तरीही बहुमतासाठी आणखी ६ जागांची उणीव भासत होती.
राज्यातील सत्तापेच सोडवण्यासाठी आता लहान पक्षांनी पुढाकार घेतल्याचे दिसत आहे. निवडणुकीत सीपीएम (CPM), सीपीआय (CPI) आणि व्हीसीके (VCK) या तिन्ही पक्षांनी प्रत्येकी २ जागा जिंकल्या आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, या सहा आमदारांनी विजय यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. हा पाठिंबा मिळाल्यास टीव्हीकेप्रणित सरकारकडे आवश्यक असलेले ११८ चे संख्याबळ पूर्ण होणार आहे. यामुळे ५९ जागा जिंकणारा सत्ताधारी डीएमके (DMK) आणि ४७ जागा जिंकणारा एआयडीएमके (AIADMK) या दोन्ही प्रबळ पक्षांना आता विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सीपीएम, सीपीआय आणि व्हीसीके या तिन्ही पक्षांच्या नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक सध्या सुरू आहे. या बैठकीत पाठिंब्याच्या अटी आणि पुढील धोरणांवर चर्चा केली जात आहे. ही बैठक संपल्यानंतर लवकरच राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला जाऊ शकतो आणि त्यानंतरच अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
तमिळगा वेत्री कझगम (TVK) : १०८
द्रविड मुन्नेत्र कळघम (DMK) : ५९
ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघम (AIADMK) : ४७
भारतीय राष्ट्रीय काँग्रेस (INC) : ५
पट्टाली मक्कल काची (PMK) : ४
इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) : २
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI) : २
विदुथलाई चिरूथईगल काची (VCK) : २
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) : २
भारतीय जनता पक्ष (BJP) : १
देसिया मुरपोक्कू द्रविड कळघम (DMDK) : १
अम्मा मक्कल मुन्नेत्र कळघम (AMMK) : १