Thalapathy Vijay: विजय थलपती पंतप्रधानपदाच्या शर्यतीत? राहुल गांधींसमोर नवं आव्हान; TVKच्या दाव्याने राजकारणात खळबळ

Vijay PM Candidate 2029: तमिळनाडूतील लोकप्रिय अभिनेता आणि TVK नेते विजय यांचे नाव आता पंतप्रधानपदाच्या चर्चेत येऊ लागले आहे.
Vijay PM Candidate 2029
Vijay PM Candidate 2029Pudhari
Published on
Updated on

Vijay PM Candidate 2029: लोकसभा निवडणूक 2029 ला अजून वेळ असला तरी देशातील राजकीय वातावरण आतापासूनच तापताना दिसत आहे. एकीकडे काँग्रेसकडून राहुल गांधी यांना भविष्यातील पंतप्रधानपदाचा चेहरा म्हणून पुढे करण्याची चर्चा सुरू आहे. दुसरीकडे तमिळनाडूतील लोकप्रिय अभिनेता आणि राजकारणी विजय यांच्या नावाचीही पंतप्रधानपदासाठी चर्चा रंगू लागली आहे.

विजय यांनी स्वतः पंतप्रधानपदाची इच्छा व्यक्त केलेली नाही. मात्र त्यांच्या पक्षातील नेते आणि समर्थक त्यांना राष्ट्रीय राजकारणातील मोठा नेता म्हणून पुढे आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यामुळे 2029 च्या लोकसभा निवडणुकीत विजय राष्ट्रीय राजकारणात एन्ट्री करणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तमिळनाडूतील एका मंत्र्याने नुकतेच विजय यांचे कौतुक करत त्यांना भविष्यातील भारताचे पंतप्रधान म्हटल्याने या चर्चेला आणखी हवा मिळाली. पक्षाच्या नेत्याने विजय हे केवळ तमिळनाडूचे नेते नसून देशाचे नेतृत्व करण्याची क्षमता त्यांच्यात असल्याचे म्हटले. त्यांच्या या वक्तव्यानंतर विजय यांच्या राजकीय भवितव्याबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली.

यापूर्वीही दक्षिण भारतातून पंतप्रधान व्हायला हवा, अशी मागणी काही नेत्यांनी केली होती. देशातील सत्ताकेंद्र केवळ उत्तर भारतातील काही राज्यांपुरते मर्यादित राहू नये, असे मत व्यक्त करण्यात आले होते. उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरातसारख्या मोठ्या राज्यांचा राष्ट्रीय राजकारणावर मोठा प्रभाव असतो.

मात्र दक्षिण भारताची अर्थव्यवस्था, विकास आणि राजकीय योगदानही तितकेच महत्त्वाचे असल्याने भविष्यात दक्षिण भारतातील नेता पंतप्रधान व्हावा, अशी भूमिका काही नेते घेत आहेत. याच पार्श्वभूमीवर विजय यांचे नाव पुढे येत आहे.

दुसरीकडे काँग्रेसने राहुल गांधी यांना 2029 च्या निवडणुकीसाठी प्रमुख चेहरा बनवण्याची तयारी सुरू केल्याची चर्चा आहे. तमिळनाडू काँग्रेसमधील नेत्यांनीही कार्यकर्त्यांना एकत्र येऊन राहुल गांधी यांना देशाचे पंतप्रधान बनवण्यासाठी काम करण्याचे आवाहन केले आहे.

म्हणजेच भविष्यात विरोधकांच्या राजकारणात नेतृत्वाचा प्रश्न मोठा ठरू शकतो. राहुल गांधी यांचे नाव आधीपासूनच राष्ट्रीय पातळीवर चर्चेत आहे. आता विजय यांचे नावही पुढे येऊ लागले आहे. या सर्व चर्चेत आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे तमिळनाडूतील राजकीय समीकरण.

Vijay PM Candidate 2029
Vinod Tawde: महाराष्ट्रातून थेट यूपीच्या रणांगणात! विनोद तावडे यांच्यावर मोठी जबाबदारी; निवडणुकीसाठी भाजपचा मोठा डाव

मिळालेल्या माहितीनुसार, विजय यांच्या नेतृत्वाखालील TVK ने विधानसभा निवडणुकीत दमदार कामगिरी केली. 234 सदस्यांच्या विधानसभेत पक्षाने 108 जागा जिंकल्या आणि बहुमतापासून काही जागा दूर राहिल्या. त्यानंतर काँग्रेसने TVK ला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. काँग्रेसकडे पाच आमदार असल्याने विजय यांच्या गटाची संख्या वाढली.

नंतर इतर काही पक्षांनीही विजय यांच्या नेतृत्वाखालील आघाडीला पाठिंबा दिला आणि राज्यातील राजकीय समीकरण बदलले. यामुळे विजय यांचा केवळ अभिनेता म्हणून नव्हे, तर प्रभावी राजकीय नेता म्हणूनही विचार केला जाऊ लागला.

TVK आणि काँग्रेस यांच्यातील जवळीक भविष्यातील निवडणुकांसाठीही महत्त्वाची ठरू शकते. स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा आणि राज्यसभा निवडणुकांमध्ये दोन्ही पक्ष एकत्र येण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे.

Vijay PM Candidate 2029
Shiv Sena Hearing:"आता डान्स करायची वेळ आलीय..."; शिवसेनाप्रकरणी युक्‍तीवाद सुरु असताना ॲड. सिब्‍बल असं का म्‍हणाले?

पण या निर्णयाचा सर्वात मोठा परिणाम DMK आणि काँग्रेसच्या जुन्या संबंधांवर झाला. काँग्रेस अनेक वर्षे DMK सोबत आघाडीत होती. 2019 आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये या आघाडीने तमिळनाडूत चांगली कामगिरी केली होती. मात्र काँग्रेसने TVK कडे झुकण्याचा निर्णय घेतल्यानंतर DMK ने नाराजी व्यक्त केली होती.

यामुळे INDIA आघाडीतील राजकीय समीकरणांवरही परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण एका राज्यातील आघाडी राष्ट्रीय पातळीवरील राजकारणातही मोठे बदल घडवू शकते.

आता सर्वात मोठा प्रश्न आहे तो विजय यांच्या पुढील भूमिकेचा. विजय खरंच राष्ट्रीय राजकारणात मोठी झेप घेणार का? त्यांना भविष्यात पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून पुढे केले जाईल का? की सध्या सुरू असलेली चर्चा ही फक्त पक्षाच्या नेत्यांकडून आणि समर्थकांकडून होणारी राजकीय ब्रँडिंग आहे? याचे उत्तर येणारा काळच देईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news