

नवी दिल्ली : उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या सात ते आठ खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचे समजते. तर इंडिया आघाडीच्या इतर देखील काही खासदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचे बोलले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व मान्य करत महाविकास आघाडीच्या काही खासदारांनी सी. पी. राधाकृष्णन यांना मतदान केले, असा दावा शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी केला.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत राज्यातील महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गटाच्या ४ ते ५, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या २ आणि काँग्रेसच्या एका खासदाराने क्रॉस वोटिंग केली. उपराष्ट्रपती पदाच्या निवडीसाठी मंगळवारी मतदान झाले आणि लगेच निकाल जाहीर करण्यात आला. यामध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे उमेदवार सी. पी. राधाकृष्णन यांचा विजय झाला. त्यांना ४५२ मते मिळाली तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मतांवर समाधान मानावे लागले.
या निवडणुकीत क्रॉस वोटिंग होईल, अशी शक्यता वर्तवली जात होती. सी. पी. राधाकृष्णन महाराष्ट्राचे राज्यपाल असल्याने राज्यातील महाविकास आघाडीचे खासदार त्यांच्या बाजूने मतदान करतील असा अंदाज लावला जात होता. त्याप्रमाणेच महाविकास आघाडीच्या सात ते आठ खासदारांनी क्रॉस वोटिंग केली.
जयराम रमेश यांचा दावा ठरला खोटा
काँग्रेस पक्षाचे माध्यम सरचिटणीस जयराम रमेश यांनी मतदान संपल्यानंतर एक्स या समाज माध्यमावर पोस्ट केली. त्यांनी म्हटले की, विरोधी पक्ष एकजूट झाला आहे. इंडिया आघाडीच्या सर्व ३१५ खासदारांनी मतदान केले आहे. ही अभूतपूर्व १००% मतदानाची टक्केवारी आहे, असे ते म्हणाले. मात्र, प्रत्यक्षात बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मतांवर समाधान मानावे लागले. त्यामुळे क्रॉस वोटिंग झाल्याचे मानले जात आहे. भाजपचे आयटी सेल प्रमुख अमित मालवीय यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर एक्सवर पोस्ट करून जयराम रमेश यांच्यावर निशाणा साधला. ते म्हणाले की, इंडिया आघाडीच्या उमेदवाराला फक्त ३०० मते मिळाली. जयराम रमेश यांनी दावा केलेल्या मतांपेक्षा १५ मते कमी आहेत, असे ते म्हणाले.