Vodafone Idea: Vi सीमकार्ड युजर्संना 'दणका'! ४२९ रुपयांचा प्लॅन झाला महाग, १९ दिवसांनी वैधता घटवली
नवी दिल्ली: टेलिकॉम कंपनी व्होडाफोन आयडियाने (Vodafone Idea - Vi) आपल्या एका लोकप्रिय प्रीपेड रिचार्ज प्लॅनमध्ये मोठा बदल केला आहे, ज्यामुळे तो आता युजर्ससाठी महाग झाला आहे. कंपनीने ४२९ रुपयांच्या प्लॅनची वैधता (Validity) थेट १९ दिवसांनी कमी केली आहे. कंपनीने किंमत न वाढवता कंपनीने हा प्लॅन महाग केला आहे.
४२९ रुपयांच्या प्लॅनमध्ये नेमका काय बदल?
कालावधी घटला
व्होडाफोन आयडियाच्या (Vi) ४२९ रुपयांच्या या अनलिमिटेड प्लॅनची वैधता ८४ दिवसांवरून ६५ दिवस करण्यात आली आहे. याचा अर्थ, युजर्सला आता १९ दिवस कमी सेवा मिळणार आहे.
डेटा वाढला
कंपनीने मोबाइल डेटा वाढवला आहे. आधी या प्लॅनमध्ये 3GB डेटा मिळत होता, आता तो वाढवून 5GB करण्यात आला आहे.
इतर फायदे कायम
कंपनीने अनलिमिटेड कॉलिंग आणि मोफत SMSचे फायदे पूर्वीप्रमाणेच कायम ठेवण्यात आले आहेत.
किंमत न वाढवता प्लॅन कसा झाला महाग?
कंपनीने प्लॅनची एकूण किंमत वाढवलेली नाही, पण वैधता कमी केल्यामुळे ग्राहकांना आता समान फायद्यांसाठी दररोज जास्त पैसे मोजावे लागतील. जुन्या प्लॅनमध्ये दैनंदिन सरासरी खर्च ५.५ रुपये होता. नवीन प्लॅनमध्ये हा खर्च वाढून ६.६ रुपये प्रतिदिन झाला आहे. यामुळे, ज्या ग्राहकांना जास्त डेटा हवा आहे, त्यांना फायदा होईल; पण ज्यांना कमी डेटा वापरून जास्त दिवसांची वैधता हवी होती, त्यांना आता जास्त वैधतेसाठी अधिक पैसे खर्च करावे लागतील.
सप्टेंबरमध्येही कालावधी केला होता कमी
कंपनीने हा बदल सध्या प्रायोगिक तत्त्वावर राजस्थान सर्कलमध्ये लागू केला आहे. थेट किंमत न वाढवता, अशा प्रकारे वैधता कमी करून कंपनी ग्राहकांसाठी प्लॅन महाग करत असल्याचे दिसून येते. यापूर्वी सप्टेंबरमध्येही कंपनीने १८९ आणि ९८ रुपयांच्या प्लॅनचा कालावधी कमी केली होती.

