तिरुअनंतपुरम: पुढारी ऑनलाईन
केरळच्या पहिल्या महसूलमंत्री के.आर. गौरी अम्मा यांचे निधन झाल्याचे वृत्त समोर आले आहे. वयाच्या १०२ वर्षी त्यांनी तिरुअनंतपुरम येथील रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. काही दिवसापूर्वी ताप, थंडी आणि श्वास घेण्यात त्रास होत असल्यामुळे त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते.
केरळमधील कम्युनिष्टांपासून – काँग्रेसपर्यंतच्या सर्वच राजकीय पक्ष-आघाड्यांसह काम करणार्या गौरीअम्मांना सर्वजण केरळच्या राजकारणातील 'पोलादी महिला' म्हणूनच संबोधित करतात. त्यांचा जन्म १४ जुलै १९१९ मध्ये अट्टप्पुझा जिल्ह्यातील चेरथळा येथील पट्टनक्कड येथे झाला होता.
केरळमधील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्या असणार्या के. आर. गौरी यांनी १९५७ पासून झालेल्या प्रत्येक सार्वत्रिक निवडणुकीत उभे राहून प्रत्येक निवडणूक लढविण्याचा एक आगळा-वेगळा राजकीय विक्रम साधला आहे.
१९५७ मध्ये केरळमध्ये प्रथमच आमदार म्हणून विधानसभेवर निवडून आलेल्या गौरी ई.एम.एस. नंबुद्रीपाद यांच्या मंत्रिमंडळातील पहिल्या महसूलमंत्री व महिला मंत्री बनल्या व नंबुद्रीपाद यांचे त्यावेळचे मंत्रीमंडळ-सरकार हे जगाच्या साम्यवाद आणि साम्यवाद्यांच्या इतिहासातील पहिले निर्वाचित मंत्रीमंडळ ठरले हे यासंदर्भात उल्लेखनीय आहे.