

पुढारी ऑनलाईन डेस्क : हिंदीतील ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांची यंदाच्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. हा पुरस्कार भारतातील सर्वोच्च साहित्य सन्मान मानला जातो. नवी दिल्ली येथे शनिवारी (दि. 22 मार्च) याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आली. (Veteran hindi poet Vinod Kumar Shukla recieves Gyanpith Award)
विनोद कुमार शुक्ल यांचा जन्म 1 जानेवारी 1937 रोजी छत्तीसगडमधील राजनांदगाव येथे झाला. सध्या ते रायपूर येथे वास्तव्यास आहेत. 50 हून अधिक वर्षांच्या साहित्यिक कारकिर्दीत त्यांनी कवितांपासून कथा-साहित्यापर्यंत विविध क्षेत्रांत आपली छाप उमटवली आहे. त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘लगभग जय हिंद’ हा 1971 मध्ये प्रकाशित झाला होता.
शुक्ल यांचे साहित्यिक योगदान
शुक्ल यांच्या ‘नौकर की कमीज’, ‘खिलेगा तो देखेंगे’ आणि ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ या कादंबऱ्या आधुनिक हिंदी साहित्यातील अत्यंत महत्त्वाच्या कलाकृती मानल्या जातात. त्यांच्या ‘पेड़ पर कमरा’ आणि ‘महाविद्यालय’ या लघुकथासंग्रहांना वाचकांची मोठी पसंती मिळाली आहे.
याशिवाय त्यांचे ‘लगभग जय हिंद’, ‘वह आदमी चला गया गरम कोट पहनकर विचार की तरह’, ‘सब कुछ होना बचा रहेगा’, ‘अतिरिक्त नहीं’, ‘कविता से लंबी कविता’, ‘आकाश धरती को खटखटाता है’ हे काव्यसंग्रह जागतिक स्तरावर नावाजले गेले आहेत.
बालसाहित्यही लोकप्रिय
याशिवाय, त्यांनी बालसाहित्यही लिहिले असून ‘हरे रंग के रंग की पत्रंगी’ आणि ‘कहीं खो गया नाम का लड़का’ ही पुस्तके लहान वाचकांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली. त्यांच्या साहित्यकृती अनेक भाषांमध्ये अनुवादित झाल्या आहेत.
पुरस्कार आणि सन्मान
विनोद कुमार शुक्ल यांना त्यांच्या साहित्य योगदानासाठी अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यामध्ये गजानन माधव मुक्तिबोध फेलोशिप, राजा पुरस्कार, वीर सिंग देव पुरस्कार, सृजनभारती पुरस्कार, रघुवीर सहाय स्मृती पुरस्कार, दयावती मोदी कवी शिखर पुरस्कार, भवानीप्रसाद मिश्र पुरस्कार, मैथिलीशरण गुप्त पुरस्कार, पं. सुंदरलाल शर्मा पुरस्कार यांचा समावेश आहे.
1999 मध्ये त्यांना ‘दीवार में एक खिड़की रहती थी’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. याशिवाय, त्यांना ‘मातृभूमी बुक ऑफ द इयर’ पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे.
आंतरराष्ट्रीय सन्मान
गेल्या वर्षी, PEN America संस्थेने त्यांना ‘नाबोकोव्ह आंतरराष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्कार’ प्रदान केला. हा पुरस्कार मिळवणारे ते पहिलेच आशियाई लेखक ठरले.
कादंबरीवर चित्रपट
विशेष म्हणजे, प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक मणी कौल यांनी त्यांच्या ‘नौकर की कमीज’ या कादंबरीवर आधारित चित्रपट तयार केला, ज्यामुळे त्यांचे साहित्य भारतीय चित्रपटसृष्टीतही अजरामर झाले आहे.
हिंदी साहित्याच्या समृद्ध परंपरेतील मानबिंदू
विनोद कुमार शुक्ल यांचे साहित्य मानवी विचार, वास्तव आणि काव्यात्मक संवेदनशीलता यांचे अप्रतिम मिश्रण आहे. ज्ञानपीठ पुरस्कारामुळे त्यांचे साहित्यीक योगदान अधिक व्यापक स्तरावर अधोरेखित झाले आहे.