

नवी दिल्ली : बाबासाहेब आंबेडकरांना मानतो म्हणायचे आणि अन्य पक्षांच्या कार्यालयामध्ये तोडफोड करायची, हे संविधान मानणारे कृत्य आहे का? असा थेट सवाल विचारत मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आणि खासदार वर्षा गायकवाड यांनी गुरूवारी (दि.१९) भाजपवर हल्लाबोल केला. तसेच संसदेत जाणीवपूर्वक धक्काबुक्की करण्यात आली, असा आरोप त्यांनी यावेळी केला.
बुधवारी सकाळी काँग्रेस विरुद्ध भाजप असा मोठा गोंधळ संसदेत पाहायला मिळाला. त्यानंतर दुपारी मुंबई काँग्रेस कार्यालयावर हल्ला झाला. या पार्श्वभूमीवर वर्षा गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी भाजपवर जोरदार टीका केली. वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई काँग्रेसच्या कार्यालयावर हल्ला करण्यात आला, त्याचा मी निषेध करते. कायदा सुव्यवस्थेचे राज्य उरले नाही. मात्र मी बाबासाहेबांची अनुयायी आहे. आम्ही लढणारे आहोत, घाबरणारे नाही, असेही त्या म्हणाल्या.
पुढे बोलताना त्या म्हणाल्या, मुंबई काँग्रेस कार्यालयावर हल्ला करण्यासाठी मोठ्या संख्येने माणसे आली. हे पोलिसांना माहिती नव्हते का? राज्यात लाडकी बहीण योजना काढायची आणि दलित बहिणींच्या कार्यालयाची तोडफोड करायची? हे कितपत योग्य आहे, असा सवालही त्यांनी यावेळी केला. करोडो रुपये शपथविधीसाठी खर्च केले मात्र राज्याला बिनखात्याचे मंत्रिमंडळ आहे. यावर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी उत्तर द्यावे, असे आवाहनही वर्षा गायकवाड यांनी केले.