

नवी दिल्ली : तुष्टीकरणाच्या राजकारणासाठी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी ‘वंदे मातरम्’चे तुकडे केले. त्यामुळे भारताची फाळणी झाली, असा घणाघात गृहमंत्री अमित शहा यांनी मंगळवारी काँग्रेसवर केला. नेहरूंनी वंदे मातरम्चे तुकडे केले आणि इंदिरा गांधी यांनी वंदे मातरम् म्हणणाऱ्यांना तुरुंगात डांबले, असा आरोपही त्यांनी केला.
‘वंदे मातरम्’वर सोमवारी लोकसभेत चर्चा झाली. त्यानंतर मंगळवारी राज्यसभेत केंद्रीय गृहमंत्री शहा यांनी चर्चेला सुरुवात केली. यावेळी त्यांनी काँग्रेससह विरोधी पक्षांनी केलेल्या टीकेवर पलटवार केला. या चर्चेला पश्चिम बंगालच्या आगामी निवडणुकीची जोड दिल्याबद्दल त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. लोकसभेतील चर्चेवेळी अनुपस्थित राहिल्याबद्दल शहा यांनी विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनाही लक्ष्य केले.
ते म्हणाले की, ‘वंदे मातरम्’ने भारताचा सांस्कृतिक राष्ट्रवाद जागृत केला. हे गीत स्वातंत्र्यलढ्यादरम्यान जितके प्रासंगिक होते. तितकेच आजही आहे. देशाला विकसित भारताकडे घेऊन जाण्यासाठी हे गीत येणाऱ्या काळातही प्रासंगिक राहील.
शहा म्हणाले की, ‘वंदे मातरम्’वर चर्चेची गरज काय, असा सवाल काल काही खासदारांनी लोकसभेत केला, पण आजही यावरील चर्चा तितकीच प्रासंगिक आहे. 2047 मध्ये जेव्हा विकसित भारत होईल तेव्हाही ती तितकीच प्रासंगिक असेल.
वंदे मातरम्च्या संदेशामागील भावना देशातील युवकांपर्यंत पोहोचवण्याचे आवाहन त्यांनी खासदारांना केले. ते म्हणाले की, हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी बंगालमध्ये लिहिले होते. परंतु ते देशभर गेले आणि भारताच्या स्वातंत्र्यलढ्याचा मंत्र बनले. ब्रिटिश सरकारने या गीतावर बंदी घालण्याचा प्रयत्न केला आणि वंदे मातरम् म्हटल्याबद्दल लोकांना मारहाण आणि तुरुंगात टाकण्यात आले. तरीही ते लोकांच्या हृदयाला भिडले आणि काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत पसरले, असे ते म्हणाले.
काँग्रेसच्या अनेक खासदारांनी वंदे मातरम्वरील चर्चेची गरज काय, असा सवाल करत मूळ मूळ मुद्द्यापासून लोकांचे लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप केला. त्याही शहा यांनी प्रत्युत्त दिलेे. आम्हाला कोणताही वादविवाद सुरू करण्याची भीती वाटत नाही. आम्ही संसदेत अडथळा आणत नाही, आमच्याकडे लपविण्यासारखे काहीही नाही, आम्ही कोणत्याही मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहोत, असे ते म्हणाले.
1937 मध्ये वंदे मातरम्च्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त जवाहरलाल नेहरूंनी त्याचे दोन तुकडे केले आणि दोन कडव्यांपर्यंत मर्यादित केले. काँग्रेसने वंदे मातरम्चा सन्मान अशा प्रकारे केला. यामुळेच विरोधी पक्षाच्या खासदारांनी निषेध केला, असे ते म्हणाले. ही तुष्टीकरणाच्या राजकारणाची सुरुवात होती यामुळे यामुळे भारताची फाळणी झाली, असे ते म्हणाले. शहा यांच्या या वक्तव्यावर आक्षेप घेत विरोधी पक्षांनी घोषणाबाजी केली.