

Gold In Wedding :
सोन्याच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. सोनं खरेदी सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर उत्तराखंडमधील एका पंचायतीनं एक अजब फर्मान सोडलं आहे. अनुसूचित जनजाती क्षेत्र जौनसार भागातील एका पंचायतीनं सोडलेला फर्मान हा महिलांनी किती सोन्याचे दागिने घालावेत याबाबत आहे. या पंचायतीनं लग्न किंवा इतर समारंभात तीन पेक्षा जास्त सोन्याचे दागिने घालण्यावर बंदी घातली आहे.
महिलांनी सोन्याच्या दागिने घालण्याबाबतचा हा नियम कंजाड आणि इंद्रोली गावात देखील लागू करण्यात आला आहे. महिलांना कानातील झुमके, नाकातील नथ आणि मंगळसूत्र हे तीनच सोन्याचे दागिने घालण्याची सूट देण्यात आली आहे. दोन गावांच्या संयुक्त पंचायतीनं या नियमांच उल्लंघन करणाऱ्या संबंधित व्यक्तीला ५० हजार रूपयाचा दंड ठोठावला आहे. दरम्यान कंदाड येथील रहिवासी असलेल्या अर्जुन सिंह यांनी सोन्याच्या वाढत्या किंमतीमुळं हा निर्णय घेतल्याचं सांगितलं.
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार अर्जुन सिंह यांनी सांगितले की, 'महिलाच सोन्याचे दागिने खरेदी करण्याचा दबाव निर्माण करतात. सोन्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळं कुटुंबात भांडणं होण्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे देखील हा निर्णय घेण्यात आला आहे.'
त्याचबरोबर अर्जुन सिंह यांनी मद्य आणि इतर वायफळ खर्चावर नियंत्रण आणण्याबाबत देखील विचार सुरू आहे असं सांगितलं. त्याच्यावर टप्प्या टप्प्यानं नियंत्रण आणलं जाईल असंही सांगण्यात येत आहे. विशेष म्हणजे महिलांनी देखील पंचायतच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. मात्र त्याच्या जोडीला काही आक्षेप देखील नोंदवले आहेत.
जौनसारच्या रहिवासी असलेल्या अमला चौहान यांनी सांगितलं की, 'जर याचा उद्येश समानता आणणं हा असेल तर फक्त महिलांनी दागिने घालण्यावर बंदी का? पुरूषांच्या देखील ब्रँडेड दारू पिण्यावर बंदी आली पाहिजे. अमला यांनी सोने ही एक गुंतवणूक आहे. कठिण काळात ही गुंतवणूक कामी येते. दारू आणि अन्य वायफळ खर्चाचं काय?
दुसरी एक महिला निशा रावत यांनी देखील लग्नातील महागड्या भेटवस्तूंच्या ट्रेंडवर चिंता व्यक्त केली. त्यांनी उंची दारू, चिकन या सर्व दिखाऊपणाच्या गोष्टी आहेत. लग्नात आधी घरात तयार झालेली दारू देण्यात येत होती. आता लोकांनी ब्रँडेड दारू आणि महागड्या भेटवस्तू देण्याचा ट्रेंड सुरू केला आहे. जर खर्च कमी करण्याची चर्चा केली जात आहे तर या महागड्या दारू आणि चिकनवर देखील निर्बंध लादले पाहिजेत.
महिलांच्या या मागणीबाबत स्थानिक नेते देखील अनुकूल असून याच्यावर देखील विचार झाला पाहिजे असं मत ते व्यक्त करत आहेत.