

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : एकीकडे राजस्थान, गुजरात आणि पंजाबमधून मान्सूनने परतीचा प्रवास सुरू केला असताना, दुसरीकडे उत्तराखंड, उत्तर प्रदेश, छत्तीसगड आणि बिहारमध्ये तो अजूनही पूर्णपणे सक्रिय आहे. विशेषतः उत्तराखंड, मणिपूर आणि हिमाचल प्रदेशात पावसाने थैमान घातले असून, मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली.
मंगळवारी उत्तराखंडमधील डेहराडून आणि आसपासच्या परिसरात झालेल्या ढगफुटीमुळे मोठी नैसर्गिक आपत्ती ओढवली. या पावसामुळे झालेल्या विविध दुर्घटनांमध्ये आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला असून, 16 जण अद्याप बेपत्ता आहेत. राज्यात एसडीआरएफ आणि एनडीआरएफची पथके तातडीने बचावकार्यात गुंतली आहेत. आतापर्यंत 900 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. यावर्षी मान्सूनने हिमाचल प्रदेशात प्रचंड नुकसान केले आहे. 20 जूनपासून आतापर्यंत राज्यात 1,500 हून अधिक घरे पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून, अनेक कुटुंबे बेघर झाली आहेत. राज्यात आतापर्यंत 4,582 कोटी रुपयांच्या सरकारी आणि खासगी मालमत्तेचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. छत्तीसगडमध्ये कवर्धा जिल्ह्यातील टमरू नाल्याला आलेल्या पुरात वाळूने भरलेली एक ट्रॅक्टर ट्रॉली वाहून गेली.
जम्मू-काश्मीरमधील कटरा येथे 22 दिवसांपासून बंद असलेली वैष्णोदेवी यात्रा आज (17 सप्टेंबर) पासून पुन्हा सुरू झाली आहे. 26 ऑगस्ट रोजी अर्धकुंवारीजवळ भूस्खलन झाल्याने हा यात्रा मार्ग बंद करण्यात आला होता.