

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने रौद्र रूप धारण केले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशमध्ये पूर, पाऊस आणि भूस्खलनामुळे हाहाकार उडाला आहे. हिमाचल प्रदेशात मृतांचा आकडा 366 वर पोहोचला आहे. पंजाबमधील सर्व जिल्हे पुराच्या विळख्यात सापडले आहेत. उत्तराखंडमध्ये ढगफुटीमुळे मोठे नुकसान झाले असून, मथुरेत यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
उत्तराखंडच्या उत्तर काशी जिल्ह्यातील नौगाव येथे आणि रुद्रप्रयागमध्ये शनिवारी सायंकाळी ढगफुटी झाली. यामुळे आलेल्या पाण्याच्या लोंढ्यासोबत मोठ्या प्रमाणात गाळ आणि दगड बाजारपेठेत आणि अनेक घरांमध्ये शिरले. रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक गाड्याही या पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्या.
दुसरीकडे, उत्तर प्रदेशातील मथुरेत यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाणी शहरापासून 1 कि.मी. आत पोहोचले आहे. घाटाजवळील अनेक आश्रमांमध्ये 5 फूट पाणी साचले असून वृंदावन परिक्रमा मार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेला आहे.
पंजाबमधील पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी 9 सप्टेंबर रोजी राज्याचा दौरा करण्याची शक्यता आहे. राज्याने पुरामुळे 13,289 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला आहे. पंतप्रधान मोदी पूरग्रस्त भागांची हवाई पाहणी करणार आहेत.