पंतप्रधानांच्या निवासस्थानी अमेरिकेच्या उपाध्यक्षांचे स्वागत: दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा
नवी दिल्ली : पुढारी वृत्तसेवा- भारत दौऱ्यावर असलेले अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स सोमवारी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानी दाखल झाले. नरेंद्र मोदींनी व्हान्स आणि कुटुंबीयांचे स्वागत केले. जे. डी. व्हान्स यांच्यासह पत्नी उषा व्हान्स, त्यांची मुले आणि अमेरिकन प्रशासनाचे वरिष्ठ सदस्य देखील होते.
यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये चांगली चर्चा झाली. या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जानेवारीमध्ये वॉशिंग्टनला दिलेल्या आपल्या भेटीची आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची आठवण करून दिली. तसेच ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ आणि ‘विकसित भारत २०४७’ या दोन्ही मोहीमांचा लाभ घेण्याबाबत चर्चा झाली होती. पंतप्रधान मोदी आणि उपाध्यक्ष व्हान्स यांनी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध क्षेत्रातील प्रगतीचा आढावा घेतला आणि सकारात्मक मूल्यांकन केले. दोन्ही देशांच्या लोकांच्या कल्याणावर लक्ष केंद्रित करणाऱ्या परस्पर हिताच्या भारत-अमेरिका द्विपक्षीय व्यापार करारासाठी झालेल्या वाटाघाटीतल्या महत्त्वपूर्ण प्रगतीचे त्यांनी स्वागत केले. त्याचप्रमाणे ऊर्जा, संरक्षण, धोरणात्मक तंत्रज्ञान आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची त्यांनी नोंद घेतली.
दोन्ही नेत्यांनी परस्पर हिताच्या विविध प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण केली आणि सहकार्य वृद्धिंगत करण्याचा मार्ग म्हणून संवाद आणि मुत्सद्देगिरीसाठी आवाहन केले. दरम्यान, या भेटीद्वारे पंतप्रधान मोदींनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनाही शुभेच्छा दिल्या आणि या वर्षाच्या अखेरीस त्यांच्या भारत भेटीबाबत आपण उत्सुक असल्याचे सांगितले.

