

नवी दिल्ली : अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स सहकुटूंब ४ दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. सोमवारी सकाळी त्यांचे दिल्लीत आगमन झाले. त्यानंतर त्यांनी दिल्लीतील प्रसिद्ध अक्षरधाम मंदीराला भेट दिली. या दौऱ्यादरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटणार आहेत. दरम्यान, उपाध्यक्ष झाल्यानंतर व्हान्स यांचा हा पहिलाच अधिकृत भारत दौरा आहे. तसेच अमेरिकेच्या टॅरिफ धोरणाच्या पार्श्वभुमीवर हा दौरा महत्वाचा आहे.
जे. डी. व्हान्स कुटुंबासह अक्षरधाम मंदिरात पोहोचल्यानंतर मंदिर व्यवस्थापनाने सर्वांचे हार घालून स्वागत केले. व्हान्स कुटुंबीयांनी मंदिर परिसरात फोटोही काढले. मंदिराला भेट दिल्यानंतर जे. डी. व्हान्स म्हणाले की, इतक्या प्रेमाने आणि आदराने आमचे स्वागत केल्याबद्दल धन्यवाद. सौंदर्यदृष्टीसह अचूकतेने बांधलेल्या या मंदिराच्या बांधकामातून भारताचे वैशिष्ट्य दिसून येते. माझ्या मुलांना हे मंदिर खूप आवडले, असेही व्हान्स म्हणाले.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हान्स सोमवारी पत्नी उषा आणि मुले इवान, विवेक आणि मिराबेलसह दिल्लीत दाखल झाले. विमानतळावर केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी त्यांचे स्वागत केले. विमानतळावरच त्यांना गार्ड ऑफ ऑनरही देण्यात आला. जे. डी. व्हान्स यांच्या स्वागतासाठी कलाकारांनी व्हान्स आणि कुटूंबासमोर पारंपारिक नृत्य सादर केले. त्यानंतर जे. डी. व्हान्स यांनी अक्षरधाम मंदिराला भेट दिली आणि जवळपास १ तास मंदिर परिसरात थांबले. जे. डी. व्हान्स आपल्या भारत दौऱ्यात पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत. तर परराष्ट्र मंत्री एस जयशंकर, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री आणि अमेरिकेतील भारतीय राजदूत विनय मोहन क्वात्रा जे. डी. व्हान्स यांची भेट घेणार आहेत.
व्हान्स यांचा भारत दौरा २ कारणांसाठी महत्त्वाचा आहे. यात पहिले म्हणजे भारत-अमेरिका व्यापार कराराचा पहिला टप्पा पूर्ण करण्याच्या दृष्टीने हा दौरा महत्त्वाचा आहे. दोन्ही देशांचे २०३० पर्यंत द्विपक्षीय व्यापार ५०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. व्हान्स आणि पंतप्रधान मोदी व्यापार, आयात शुल्क आणि नॉन-टॅरिफ अडथळे कमी करण्यावर चर्चा करण्याची शक्यता आहे. तर दुसरे म्हणजे ट्रम्प प्रशासनाच्या टॅरिफ धोरणाच्या अनुषंगानेही हा दौरा महत्वाचा आहे. व्हान्स यांच्या भेटीत या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.