

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अमेरिकेने शुल्कवाढीची घोषणा केल्याने गत आर्थिक वर्षाची सुरुवात अस्थिरतेने झाली. एप्रिल ते सप्टेंबर-2025 या कालावधीत वाहनांच्या सुट्या भागांचे उत्पादन घेणार्या संस्थांची उलाढाल 6.8 टक्क्यांनी वाढून 3.56 लाख कोटी रुपयांवर गेली असल्याची माहिती ‘ऑटोमोटिव्ह कंपोनंट मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ इंडिया’ (एसीएमए) ने दिली.
शुल्कवाढीचा दबाव असतानाही एप्रिल ते सप्टेंबर-2025 या कालावधीतील अमेरिकेची निर्यात 3.67 वरून 3.64 अब्ज डॉलरवर आली. अमेरिका आणि लॅटिन अमेरिकेत होणारी निर्यात फार घटू न देण्यात उद्योगाला यश आले आहे. या कालावधीत अमेरिकेहून होणारी आयात 0.79 वरून 0.92 अब्ज डॉलरवर वाढली आहे. एकूण निर्यात 9.3 टक्क्यांनी वाढून 12.1 अब्ज डॉलरवर गेली आहे. एप्रिल ते सप्टेंबर-2024 या कालावधीत निर्यात 12.5 टक्क्यांनी वाढून 12.3 अब्ज डॉलरवर गेली आहे. व्यापारी तूट 18 कोटी रुपयांवर गेली आहे. त्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 च्या सहामाहीत 15 कोटी डॉलरने निर्यात अधिक होती.
आतापर्यंत शुल्कवाढीचा परिणाम दिसलेला नाही; पण याचा खरा परिणाम वर्षाच्या दुसर्या सहामाहीत दिसून येईल. मूळ उपकरण उत्पादकांना (ओईएमएस) आणि कंपन्यांना पुरवठादार व पुरवठा साखळीची पडताळणी करावी लागते. काही कंपन्यांच्या नवीन मागणीचा वेग मंदावला आहे. त्यामुळे, याचा परिणाम 2026 मध्ये नव्हे, तर 2027 च्या आर्थिक वर्षात होऊ शकतो, असे ‘एसीएमए’चे अध्यक्ष विक्रमपती सिंघानिया म्हणाले.
आव्हानांना दिले तोंड
‘एसीएमए’ने म्हटले आहे की, विस्कळीत झालेली पुरवठा साखळी, कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि प्रमुख बाजारपेठांमधील मागणीत झालेली घट, यासारख्या जागतिक आव्हानांना तोंड द्यावे लागले. त्यानंतरही चालू आर्थिक वर्षाच्या (2025-26) एप्रिल-सप्टेंबर कालावधीत चांगली निर्यात झाली. अमेरिका आणि जर्मनी हे प्रमुख निर्यात देश राहिले, तर चीन, जपान आणि जर्मनी हे आयातीचे प्रमुख स्रोत आहेत.