

नवी दिल्ली : गेल्या ४८ तासांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी युएई, इस्रायल, सौदी अरेबिया, जॉर्डन, बहरीन, ओमान, कुवेत आणि कतारच्या प्रमुखांशी फोनवरून संवाद साधला. आखाती देशांतील संघर्षाच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा संवाद साधला. यावेळी आखाती देशांवरील इराणच्या हल्ल्याचा पंतप्रधान मोदींनी निषेध व्यक्त केला. तसेच या देशांतील भारतीय नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत चर्चा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'एक्स'वर पोस्ट करत या संवादाची माहिती दिली. आखाती देशांसोबत एकजुटीने उभे असल्याचे त्यांनी सांगितले. आखाती देशांच्या सार्वभौमत्वाचे आणि प्रादेशिक अखंडतेचे उल्लंघन झाल्याचा त्यांनी निषेध व्यक्त केला. संवाद आणि राजनैतिकतेद्वारे या प्रदेशात शांतता आणि स्थिरता पुनर्संचयित करण्याची तातडीची गरज त्यांनी अधोरेखित केली.
पंतप्रधान मोदींनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू, कतारचे अमीर तमीम बिन हमद अल थानी, ओमानचे सुलतान हैथम बिन तारिक, कुवेतचे क्राउन प्रिन्स सबा अल-खालेद अल-हमद अल-मुबारक अल-सबा, जॉर्डनचे राजा, राजा अब्दुल्लाह द्वितीय, सौदी अरेबियाचे युवराज मोहम्मद बिन सलमान अल सौद आणि बहरीनचे राजे हमद बिन इसा अल खलिफा यांच्याशी फोनवरून स्वतंत्र संवाद साधला.
पंतप्रधान मोदी यांनी संबंधित देशांमध्ये झालेल्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली आणि तेथे राहणाऱ्या भारतीय नागिकांच्या सुरक्षिततेबद्दल चर्चा केली. या सर्व देशांतील भारतीय नागरिकांची सुरक्षा आणि काळजी घेतल्याबद्दल प्रमुखांचे आभार मानले.