

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर शुल्क लादण्याचा अमेरिकेचा निर्णय ’अनादर करणारा आणि अज्ञानी’ आहे, अशा शब्दांत प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार आणि राजकीय विश्लेषक रिक सांचेझ यांनी ट्रम्प प्रशासनावर टीका केली आहे. भारताने आपली भूमिका ठाम ठेवल्याबद्दल त्यांनी भारताचे कौतुकही केले.
एका मुलाखतीत बोलताना सांचेझ यांनी अमेरिकेच्या धोरणावर जोरदार टीका केली. भारताला काय करावे आणि काय करू नये हे सांगणे म्हणजे एखाद्या शाळेतील मुलासारखी वागणूक देण्यासारखे आहे, असे ते म्हणाले.
सांचेझ यांच्या मते, भारत आता मोठा झाला आहे, तो शाळेत जाणारा लहान मुलगा नाही. जेव्हा भारताने अमेरिकेला स्पष्टपणे सांगितले की, आम्ही कोणाकडून तेल खरेदी करावे हे तुम्ही आम्हाला सांगू नका, तो एक ऐतिहासिक आणि परिवर्तनीय क्षण होता. अमेरिकेचे हे धोरण भारताचा इतिहास, क्षमता आणि संसाधने यांचा अपमान करणारे आहे, असेही ते म्हणाले.
भारताच्या या ठाम भूमिकेमुळे जागतिक सत्तेचे केंद्र हळूहळू पश्चिमेकडून ‘ग्लोबल साऊथ’ म्हणजेच भारत, चीन, रशिया आणि ब्राझील यांसारख्या देशांकडे सरकेल, असा विश्वास सांचेझ यांनी व्यक्त केला. भविष्यात इतिहासकार या घटनेची नक्कीच दखल घेतील, असेही ते म्हणाले.