

नवी दिल्ली : देशात यंदाच्या केवळ ऑगस्ट महिन्यात यूपीआयद्वारे तब्बल २९.८२ लाख कोटी रुपयांचे डिजिटल व्यवहार झाले असून हा आतापर्यंतचा सर्वोच्च ऐतिहासिक विक्रम आहे.
नॅशनल पेमेंटस् कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने (एनपीसीआय) जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार हा टप्पा रिझर्व्ह बँकेच्या विक्रमी पातळीच्या अगदी जवळ पोहोचला आहे. या व्यवहारांद्वारे २९.८२ लाख कोटी रुपयांची देवाणघेवाण झाली आणि ती गेल्या वर्षीच्या ऑगस्ट महिन्यापेक्षा २० टक्के जास्त आहे.
या महिन्यात एकूण २४.५१ अब्ज (२,४५१ कोटी) व्यवहार झाले. व्यवहारांच्या संख्येत वार्षिक आधारावर २२ टक्के वाढ नोंदवली गेली. यापूर्वी यंदा मे महिन्यात यूपीआय माध्यमातून २९.९० लाख कोटी रुपयांचे आर्थिक व्यवहार होऊन एकूण व्यवहारांची संख्या २३.२ अब्ज वर पोहोचली होती. तो विक्रम ऑगस्टमध्ये मागे पडला आहे.
भारताची ही पेमेंट सिस्टीम आता जगातील ११ देशांमध्ये कार्यरत झाली आहे. यामध्ये सिंगापूर, यूएई, फ्रान्स, श्रीलंका, मॉरिशस आणि नुकताच करार झालेला उझबेकिस्तान यांसारख्या देशांचा समावेश आहे.
वस्तू आणि सेवा कराचे (जीएसटी) संकलन १४.८ टक्क्यांनी वाढून १ लाख ९९ हजार ८५३ कोटी रुपयांच्या घरात गेले आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये जीएसटी संकलन १ लाख ७४ हजार ११६ कोटी रुपये असल्याचे सरकारने मंगळवारी जाहीर केले. स्थानिक जीएसटी संकलन ९.३ टक्क्यांनी वाढून १ लाख ३७ हजार २४९ कोटी रुपयांवर गेले आहे. गतवर्षी स्थानिक कर संकलन १ लाख २५ हजार ५७० कोटी रुपयांवर गेला आहे.