पुढारी ऑनलाईन डेस्क : पान, तंबाखू आणि पान मसाला खाऊन रस्त्यावर पिचकारी मारणे, हे आपल्याकडे हमखास दिसणारे चित्र. पण, लोकशाहीचे मंदिर म्हणून ओळखल्या जाणार्या विधानसभेतच कोणी पान मसाला खाऊन पिचकारी मारली तर.! वाचून तुम्हीही अवाक झाला असाल मात्र असा किळसवाणा प्रकार उत्तर प्रदेश विधानसभा सभागृहात घडला. आमदाराने थेट विधानसभा प्रवेशद्वारावरच पान मसाला खाऊन पिचकारी मारली असल्याचे निदर्शनास आले. या बेजबाबदार आणि बेशिस्त कृत्यावर विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विधानसभा सभागृहाची स्वच्छता आणि प्रतिष्ठा राखणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आज विधानसभेचे कामकाज सुरू होण्यापूर्वी सभागृहाच्या प्रवेशद्वारावरच आमदाराने पान मसाला खाऊन पिचकारी मारल्याचा प्रकार निदर्शनास आला. विधानसभा अध्यक्ष सतीश महाना तडक प्रवेशद्वारावरच पोहोचले. या वर्तनाचा त्यांनी तीव्र शब्दांमध्ये निषेध केला. सभागृहात विषयावर आज (दि.४) चर्चा झाली. यावेळी विधानसभा अध्यक्ष सतीश महाना यांनी या बेशिस्तवर्तनावर तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच विधानसभेची प्रतिष्ठा आणि स्वच्छता राखण्याचा संकल्पही केला.
या प्रकारानंतर सभागृहाला संबोधित करताना अध्यक्ष सतीश महाना म्हणाले की, या बेशिस्त कृत्याचा व्हिडिओ उपलब्ध आहे; परंतु कोणत्याही सदस्याचा सार्वजनिकरित्या अपमान करण्याचा त्यांचा हेतू नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच भविष्यात असे वर्तन करताना कोणी आढळले तर त्याला तिथेच थांबवावे लागले. विधानसभेची प्रतिष्ठा राखण्यासाठी सहकार्य करा. ज्यांनी हे केले आहे त्यांनी पुढे येऊन ते स्वीकारावे, असे आवाहनही त्यांनी केले.
ही केवळ एका व्यक्तीची जबाबदारी नाही तर विधानसभेप्रती आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. उत्तर प्रदेश विधानसभा ही राज्यातील २५ कोटी नागरिकांच्या आदर आणि श्रद्धेचे प्रतीक आहे. या सभागृहाची स्वच्छता आणि प्रतिष्ठा राखणे ही आपल्या सर्वांची सामूहिक जबाबदारी असल्याचेही अध्यक्ष सतीश महाना यांनी सदस्यांना सांगितले.