

bride demand 90 lakh wedding night UP Crime News
आग्रा: लग्नाच्या पहिल्याच रात्री पत्नीने '९० लाख रुपये द्या, अन्यथा सुहागरात नाही,' अशी धक्कादायक मागणी केल्याने नवरदेवासह संपूर्ण कुटुंब हादरलं. अखेर पतीकडून ही मागणी पूर्ण न झाल्याने दोन्ही कुटुंबांतील वाद विकोपाला गेला, मुलीच्या कुटुंबीयांनी मुलाच्या घराची गॅस पाईपलाईन कापून संपूर्ण कुटुंबाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. उत्तर प्रदेशातील आग्र्यामध्ये ही खळबळजनक घटना घडली आहे.
आग्रा येथील एका तरुणाचे गेल्यावर्षी २९ एप्रिलला कल्पना नावाच्या तरुणीशी लग्न झाले होते. मात्र, लग्नाच्या पहिल्याच रात्री कल्पनाने पतीकडे ९० लाख रुपयांची मागणी केली. "जोपर्यंत ९० लाख रुपये मिळत नाहीत, तोपर्यंत मी घुंघट उचलणार नाही," अशी टोकाची भूमिका तिने घेतली. या अजब मागणीमुळे वराचे कुटुंब हादरून गेले. पैसे देण्यास नकार दिल्यानंतर, पत्नी घरातील दागिने घेऊन माहेरी निघून गेली.
मुलाची बहीण मुस्कान सिंग हिने दिलेल्या तक्रारीनुसार, तेव्हापासून मुलीच्या घरच्यांकडून सातत्याने धमक्या येत होत्या. जुलै महिन्यात पैसे न दिल्यास जिवंत जाळण्याची धमकी दिली, तर त्यानंतर व्हॉट्सॲपवरून खंडणी मागण्याचा प्रयत्न केला. या वादाने २६ मार्च रोजी गंभीर वळण घेतले. मुलीच्या नातेवाईकांनी मुलाच्या घरावर हल्ला केला. एवढेच नाही तर, संपूर्ण कुटुंबाला संपवण्यासाठी त्यांनी घरातील पीएनजी गॅसची पाईपलाईन तोडून आग लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत कुटुंबीयांनी पोलिसांना संपर्क केला आणि पोलिसांनी वेळेत येऊन त्यांची सुरक्षित सुटका केली.
या गंभीर प्रकरणात स्थानिक पोलिसांनी सुरुवातीला कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप पीडित मुलाच्या कुटुंबाने केला आहे. अखेर पीडितांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले. न्यायालयाच्या कडक आदेशानंतर आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.