

श्री विजयपूरम, (अंदमान-निकोबार) : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘सागरा प्राण तळमळला’ या अमर्त्य काव्यपंक्तींनी लाखो भारतीयांच्या हृदयात राष्ट्रवादाची वात चेतवली, या गोष्टीला 116 वर्षे झाली. त्या निमित्त आंदमान-निकोबारच्या श्री विजय पुरम येथे शुक्रवारी सावरकरांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले.
या पुतळ्याची रचना प्रख्यात शिल्पकार राम सुतार यांची आहे. हा पुतळा म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रखर राष्ट्रवादाचे, अजोड त्यागाचे आणि निडर विचारसरणीचे प्रतीक आहे, अशा भावना यावेळी व्यक्त झाल्या.
या निमित्त मुंबईच्या व्हॅल्यूएबल ग्रुपचे संस्थापक अमेय हेटे यांनी “सागरा प्राण तळमळला“ या भव्य सोहळ्याचे आयोजन केले होते. अमेय हेटे म्हणाले, हा सोहळा म्हणजे केवळ एक सांस्कृतिक सोहळा नसून ही भारतीय स्वातंत्र्य लढ्याच्या इतिहासाला वाहिलेली एक मानवंदना आहे. यावेळी लेफ्टनंट गव्हर्नर अॅडमिरल (निवृत्त)देवेंद्र कुमार जोशी, आणि महाराष्ट्राचे सांस्कृतिक आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अॅड.आशिष शेलार यावेळी विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते.