

नवी दिल्ली : इंजिनिअर, डॉक्टर, वकील असे अनेक क्षेत्र करियर म्हणून निवडू शकतो, मोठा व्यवसाय करू शकतो. मात्र जीवन जगताना चांगला माणूस म्हणून जीवन जगले पाहिजे, असा अनमोल संदेश केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री गडकरी यांनी विद्यार्थ्यांना दिला.
'पुढारी' टॅलेंट सर्च परीक्षेत प्राविण्य प्राप्त विद्यार्थ्यांनी गडकरींची भेट घेतली. त्यांनी विद्यार्थ्यांसमवेत आपुलकीने संवाद साधला. आपल्या शाळा, महाविद्यालयातील किस्से सांगत जुन्या आठवणींना उजाळा दिला. दैनिक मपुढारीफचे चेअरमन व समूह संपादक डॉ. योगेश जाधव व संचालिका डॉ. स्मितादेवी जाधव यांनी गडकरी यांचे पुष्पगुच्छ देऊन पुढारी समूहाच्यावतीने स्वागत केले. जगभरातील गाड्यांच्या तंत्रज्ञानाबद्दल गडकरींनी विद्यार्थ्यांना माहिती दिली. भविष्यात तंत्रज्ञान कसे बदलू शकते, यावर त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. दरम्यान, त्यांच्या घरी असलेली हायड्रोजनवर चालणारी गाडी त्यांनी आवर्जून विद्यार्थ्यांना दाखवली. कृषी क्षेत्राबद्दल बोलताना त्यांनी शेतकरी हा देशाचा अन्नदाता आहे, हा अन्नदाता आता ऊर्जादाता झाला पाहिजे, असेही ते म्हणाले.
मंत्री गडकरी यांना भेटल्यानंतर ज्यांना टीव्हीवर बघतो त्यांना प्रत्यक्ष भेटल्याचा आनंद विद्यार्थ्यांच्या चेहर्यावर दिसत होता. यावेळी नंदुरबारचे प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार, वितरण विभागाचे सरव्यवस्थापक डॉ. सुनील लोंढे आदी उपस्थित होते.