L Murugan Resign : केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांचा राजीनामा!

मंत्रीपद आणि राज्यसभा सदस्यत्‍व दोन्ही सोडले, तळागाळात काम करणार, मुरुगन यांनी 'X'वर पोस्ट करुन दिली माहिती
L Murugan Resign : केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांचा राजीनामा!
Published on: 
Updated on: 

L Murugan Resigns मोदी सरकारमधील दक्षीणेतील प्रमुख चेहरा व केंद्रीय माहिती प्रसारण राज्यमंत्री एल. मुरुगन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्‍यांच्या या तडकाफडकी निर्णयामुळे राजकीय चर्चेला तोंड फूटले आहे. केवळ मंत्रीपदच नव्हे, तर त्यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचाही राजीनामा सुपूर्द केला आहे. आगामी काळात तामिळनाडूमध्ये भाजपची पाळेमुळे घट्ट करणे आणि पक्षविस्तार करणे या उद्देशाने त्यांनी हा निर्णय घेतल्याचे त्‍यांनी आपल्या एक्स अकाऊंटवरुन सांगितले आहे.

काय म्हणाले एल. मुरुगन

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत मुरुगन यांनी आपल्या राजीनामा व राज्यसभा सदस्यतत्‍वाचा राजीनामा का दिला याची स्पष्टता दिली. त्‍यांनी म्हटले आहे की "मला पुन्हा एकदा तळागाळातील राजकारणात परतायचे आहे. आपल्या सामान्य कार्यकर्त्यांसोबत जमिनीवर राहून काम करायचे असून, आगामी २०२९ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये भारतीय जनता पक्षाला संघटनात्मकदृष्ट्या अधिक मजबूत करणे हे माझे मुख्य उद्दिष्ट आहे’

‘एका मजुराच्या मुलाचा केंद्रीय मंत्रिमंडळापर्यंतचा प्रवास...’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक करताना मुरुगन म्हणाले की "पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली भारतमाता आणि तामिळनाडूची सेवा करण्याची संधी मिळणे हा माझ्या आयुष्यातील सर्वोच्च सन्मान राहिला आहे. एका रोजंदारी मजुराच्या मुलापासून ते थेट केंद्रीय मंत्रिमंडळात काम करण्यापर्यंतचा हा प्रवास माझ्यासाठी भाग्याचा होता," अशा शब्दांत त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.

मुरुगन यांची राजकीय कारकीर्द

एल. मुरुगन हे पहिल्यांदा २०२१ मध्ये राज्यसभेवर निवडून आले होते. त्यानंतर २०२४ मध्ये त्यांना दुसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवण्यात आले होते. त्यांच्या या राजीनाम्यामुळे राज्यसभेत त्यांची जागा रिक्त होणार आहे. राजकीय विश्लेषकांच्या मते, मुरुगन यांच्या सक्रियपणे मैदानात उतरण्यामुळे तामिळनाडूतील भाजपच्या स्थानिक संघटनेला मोठी ताकद मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१२ मार्च २०२० रोजी त्यांची भाजपने तामिळनाडूचे पक्ष प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती. त्‍यांनतर २०२१ मध्ये राज्यसभेत गेले होते. तमिळनाडू भाजपाची मुळे रुजवण्यात मुरुगन यांचे योगदान आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news