नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : केंद्रीय मंत्रिमंडळाने अर्थसंकल्पापूर्वी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पेट्रोलमध्ये मिश्रीत केल्या जाणाऱ्या इथेनॉलच्या किमती वाढवण्यात आल्या आहेत. ( Ethanol price hick) पूर्वी सरकारी कंपन्या ५६.५८ रुपये प्रति लिटर दराने इथेनॉल खरेदी करायच्या. आता तेच इथेनॉल ५७.९७ रुपये प्रति लिटर दराने खरेदी केले जाईल. म्हणजेच इथेनॉलच्या किंमतीत ३ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. याचा थेट फायदा ऊस उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे.
मंत्रिमंडळाच्या निर्णयाची माहिती देताना केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की, सरकारने इथेनॉलसाठी नवीन दर निश्चित केले आहेत. उसाच्या रसापासून तयार होणाऱ्या इथेनॉलची किंमत प्रति लिटर ६५.६१ रुपये, बी-हेवी गुळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची प्रति लिटर ६०.७३ रुपये आणि सी-हेवी गुळीपासून तयार होणाऱ्या इथेनॉलची किंमत प्रति लिटर ५७.९७ रुपये असेल. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे इथेनॉल पुरवठादारांना किंमत स्थिरता आणि किफायतशीर किमती प्रदान करण्याचे धोरण सुरू ठेवण्यास सरकारला मदत होईल, असे वैष्णव म्हणाले. शिवाय कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास, परकीय चलन वाचवण्यास आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यास देखील मदत होईल, असे ते म्हणाले.
अश्विनी वैष्णव म्हणाले की, केंद्र सरकारने २०३० च्या ऐवजी २०२५-२६ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिश्रीत करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. तेल कंपन्यांनी २०२४-२५ दरम्यान १८ टक्के मिश्रणाचे लक्ष्य साध्य करण्याची योजना आखली आहे. ते म्हणाले की, गेल्या दहा वर्षांत (३१ डिसेंबर २०२४ पर्यंत), सार्वजनिक क्षेत्रातील तेल विपणन कंपन्यांनी (ओएमसी) पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळल्यामुळे १,१३,००७ कोटी रुपयांपेक्षा जास्त परकीय चलनाची बचत झाली आहे. अंदाजे १९३ लाख मेट्रिक टन कच्च्या तेलाच्या ऐवजी इथेनॉल मिश्रित तेलाचा वापर करण्यात आला असल्याचे ते म्हणाले.