पुढारी ऑनलाईन डेस्क : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या (Union Cabinet Decisions) बैठकीत आज (दि.१८) अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. चांद्रयान-4 मोहिमेच्या विस्तारासोबतच शुक्र ग्रहावरील मोहीम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर दिली. ते माध्यमांशी बोलत होते.
मंत्री वैष्णव म्हणाले की, चांद्रयान-4 मोहिमेचा विस्तार करण्यात आला आहे. चंद्रावर मानवयुक्त मोहीम राबविणे हे पुढचे पाऊल आहे. या मोहिमेत चंद्रावरील खडक आणि माती पृथ्वीवर आणली जाणार आहे. त्यासाठी सर्व बाबींना मान्यता देण्यात आली आहे. यासोबतच व्हीनस ऑर्बिटर मिशन, गगनयान फॉलो-ऑन आणि इंडियन स्पेस स्टेशन आणि नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकल डेव्हलपमेंटलाही मान्यता देण्यात आली (Union Cabinet Decisions) आहे.
शुक्र ग्रहावरील वैज्ञानिक शोधासाठी आणि शुक्राचे वातावरण, भूगर्भशास्त्र अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी आणि त्याच्या सखोल वातावरणाची तपासणी करून मोठ्या प्रमाणात वैज्ञानिक डेटा गोळा करण्यासाठी व्हीनस ऑर्बिटिंग मिशन (VOM) ला देखील मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाने हेवी नेक्स्ट जनरेशन लॉन्च व्हेईकलला पृथ्वीच्या निम्न कक्षेत 30 टन पेलोड ठेवण्यासाठी मंजुरी दिली आहे, असेही वैष्णव यांनी सांगितले.