

पुढारी ऑनलाईन डेस्क: मध्य प्रदेशच्या बुरहानपूर जिल्ह्यात एका 25 वर्षीय तरुणाची हत्या त्याच्या 17 वर्षीय पत्नीने केल्याचे समोर आले आहे. प्रियकराच्या दोन मित्रांच्या मदतीने अल्पवयीने पत्नीने पतीचा खून केला.
पत्नीने फुटलेल्या बियर बॉटलने पतीला 36 वेळा भोसकले. हत्येनंतर, त्या प्रियकराला व्हिडिओ कॉल करून रक्तात माखलेले पतीचा मृतदेह दाखवला आणि 'काम हो गया' असे सांगितले.
त्यानंतर ती अल्पवयीन पत्नी तिच्या बॉयफ्रेंडच्या दोन मित्रांसमवेत तिथून पसार झाली. त्यापैकी एक मित्र अल्पवयीन होता.
बुरहानपूरचे एसपी देवेंद्र पाटीदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 एप्रिल रोजी इंदोर-इच्छापूर रोडवरील आयटीआय कॉलेजच्या समोर जंगलात एक मृतदेह आढळून आला होता. तपासात हा मृतदेह राहुल पांडे (गोल्डन) याचा असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेहावर अनेक गंभीर जखमा होत्या.
तपासानंतर, राहुलची पत्नी फरार होती आणि ती युबराज नावाच्या एक व्यक्तीसोबत तिचे अफेयर असल्याचेही समोर आले. युबराजला ताब्यात घेतल्यावर त्याने हत्येची योजना राहुलच्या पत्नीच्या मदतीने आखल्याचे कबूल केले.
12 एप्रिलच्या रात्री, राहुलच्या पत्नीने तिच्या प्रेमी युबराजला व्हिडिओ कॉल केला आणि राहुलच्या रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह दाखवला. तिने त्याला 'काम हो गया' असेही सांगितले. त्यानंतर ती, तिचा अल्पवयीन साथीदार आणि ललित हे तीन आरोपी पळून गेले. त्यांना संवर येथून त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. चौकशीमध्ये अल्पवयीन पत्नीने हत्येची कबुली दिली.
राहुलला शॉपिंगसाठी बाहेर घेऊन जाऊन, बाजारातून परतल्यानंतर त्याला एका रस्त्यावरील धाव्यावर जेवण करण्यासाठी थांबवले. बाजारातून परत येऊन एक रस्त्यावरील हॉटेलमध्ये जेवण केल्यानंतर, त्यांना लालित आणि अल्पवयीन मित्राने त्या रूटवरील एक जुन्या आरटीओ बॅरियरपासून त्यांचा पाठलाग केला.
पत्नीने आयटीआय कॉलेजच्या समोर एक स्पीड ब्रेकरजवळ चप्पल टाकले आणि राहुलला गाडी थांबवायला सांगितले. गाडी थांबल्यावर लालित आणि अल्पवयीन मित्र मोटरसायकलवर आले. त्यांनी राहुलला गवताळ भागात ओढून घेतले आणि त्याला मारहाण केली.
पत्नीने राहुल वर फुटलेल्या बियर बॉटलने वार केले. त्यामुळे तो बेशुद्ध झाला. नंतर, अल्पवयीन मुलाने दुसऱ्या बॉटलने त्याला मारून धारदार हत्याराने त्याला वारंवार भोसकले. लालितनेही राहुलला अनेक वेळा भोसकले.
हत्येनंतर, तीनही आरोपी रावेर रेल्वे स्थानकावर गेले, तिथून इटारसीला ट्रेन घेतली आणि नंतर उज्जैनकडे निघाले. या संपूर्ण गुन्ह्यात सर्व चार आरोपी मोबाइलद्वारे संपर्कात होते.
पोलिसांनी सांगितलं की, अटक केलेल्यांमध्ये भारत उर्फ युबराज कैलाश पाटिल (वय 20), लालित संतोष पाटील (20, दोघे रा. कोडरी शाहपूर बुरहानपूर), मृताची अल्पवयीन पत्नी आणि एक अल्पवयीन साथीदार याचा समावेश आहे.