पुढारी ऑनलाईन डेस्क : २०२० मध्ये ईशान्य दिल्लीत झालेल्या दंगल प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी उमर खालिद (Umar Khalid) याला दिल्ली न्यायालयाने आज (दि.१८) अंतरिम जामीन मंजूर केला. चुलत भावाच्या विवाह साेहळ्यास उपस्थित राहण्यासाठी न्यायालयाने त्याला 28 डिसेंबर ते 3 जानेवारीपर्यंत जामीन मंजूर केला आहे.
खालिदने चुलत भावाच्या विवाह साेहळ्यास उपस्थित राहण्यासाठी १० दिवसांचा अंतरिम जामीन मागितला होता, मात्र न्यायालयाने त्याला सात दिवसांचा जामीन अटींसह मंजूर केला.
नागरिकत्व (सुधारणा) कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिक नोंदणी (एनआरसी) विरोधात २३ फेब्रुवारी २०२० रोजी निदर्शने झाली. त्याच रात्री झालेल्या हिंसाचारात ५३ जणांचा मृत्यू झाला होता. तर ७०० हून अधिक जण जखमी झाले होते. दिल्ली दंगलींमागील कथित मोठ्या कटाच्या आरोपाखाली यूएपीए प्रकरणात 14 सप्टेंबर 2020 रोजी दिल्ली पोलिसांनी उमर खालिद याला अटक केली होती. तेव्हापासून तो कोठडीत आहे. जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिद हा दंगलीचा सूत्रधार होता, असा दावा दिल्ली पोलिसांनी केला. विशेष सरकारी वकील अमित प्रसाद यांनी असा युक्तिवाद केला होता की, "अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत भेटीदरम्यान हिंसाचार घडवण्याच्या कटाचा हा भाग होता." एका विशिष्ट समाजाला टार्गेट करण्यासाठी आणि त्या समाजाची मालमत्तेचे नुकसान करण्याच्या उद्देशाने हा हिंसाचार घडवून आणण्यात आला होता.
दिल्ली पोलिसांनी खालिदला जामीन देण्यास विरोध केला होता. 28 मे रोजी दिल्ली सत्र न्यायालयाने खालिदची दुसऱ्यांदा नियमित जामीन मागणारी याचिका फेटाळली होती. 18 ऑक्टोबर 2022 रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने पहिली जामीन याचिका फेटाळली. तसेच खालिद याच्यावरील दिल्ली पोलिसांचे आरोप प्रथमदर्शनी खरे आहेत, असेही म्हटलं होते. दिल्लीत सीएए विरोधी निदर्शने हिंसक दंगलीत रूपांतरित झाली. ही दंगल पूर्वनियोजित होती. साक्षीदारांच्या विधानांवरून खालिदचा निषेधांमध्ये सक्रिय सहभाग" असल्याचे सूचित होते, असेही निरीक्षण न्यायालयाने नोंदवले होते.