

नवी दिल्ली : छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वक्तव्य केलेल्या राहुल सोलापूरक सारख्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत, असे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. देशातील महापुरुषांविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे खासदार उदयनराजे भोसले म्हणाले. राहुल सोलापूरकर प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे खासदार उदयनराजे म्हणाले.
खासदार उदयनराजे भोसले दिल्लीतील पत्रकार परिषदेत राहुल सोलापूरकरच्या विधानावर संताप व्यक्त केला. ते म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी जगाला विचार दिले. लोकशाहीचा पाया छत्रपती शिवाजी महाराज यांनी रचला. त्यांनी स्वतःचा स्वार्थ कधीच पाहिला नाही वेगवेगळ्या जातीच्या लोकांना त्यांनी कुटुंब म्हणून पाहिले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी तत्वाशी कधीच तडजोड केली नाही.
राहुल सोलापूर कोण आहे ? यांना लाचेच्या पलिकडे काही माहीत नसते, अशा लोकांच्या जिभा हासडल्या पाहिजेत. याचा मी कठोर शब्दात निषेध करतो. या सगळ्यांना जनतेने दिसेल तिथे ठेचले पाहिजे. या लोकांना गाडले पाहिजे. या विकृतीत वाढ झाली तर देशाच्या अखंडतेला धोका निर्माण होईल. या प्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. यावेळी कडक कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार जपले नाहीत तर देशाचे तुकडे होतील, असे ते म्हणाले.
उदयनराजे भोसले म्हणाले की, खासदार, आमदार, मंत्री, उद्योजक कोणी असला आणि असे विधान केले तर कोणालाही सोडायला नको. त्यांना ठेचून गाडले पाहिजे. ही चूक नाही तर घोडचूक आहे, असे ते म्हणाले. यांना वेळीच आळा घातला नाही तर आपला इतिहास वेगळा वळण घेईल, असे ते म्हणाले. औरंगजेब हरामखोरहोता. तू (राहुल) कमी हरामखोर आहेस का ? तू औरंगजेबाची औलाद आहेस असं वाटते, असा घणाघात त्यांनी केला.
महापुरुषांविषयीचे असे वक्तव्य व्हायरल करणाऱ्यांवर डिजीटल सेन्सॉरशिप असली पाहिजे, असे मत उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले. इतिहासाची माहिती असणाऱ्याकडून याची तपासणी झाली पाहिजे, असे ते म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील प्रस्तावित पुतळ्याविषयी बोलताना ते म्हणाले की, आतापर्यंत हा पुतळा व्हायला पाहिजे होता. पुतळ्यासाठी खर्च होणारे पैसे किल्ल्यांच्या संवर्धनासाठी खर्च करायला पाहिजे, असे ते म्हणाले.