

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजस्थानमधील कोटा येथे २४ तासांमध्ये अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठीच्या जेईई परीक्षेची तयारी करणार्या दोन विद्यार्थ्यांनी जीवन संपवले आहे, असे वृत्त 'एनडीटीव्ही'ने दिले आहे. २४ तासांत परीक्षा ताण सहन न झाल्याने दोन विद्यार्थ्यांनी उचलले टोकाचे पाऊल उचलल्याने कोटात खळबळ माजली आहे.
आज जीवन संपवेल्या विद्यार्थ्याचे नाव अभिषेक लोढा असे आहे. त्याने जीवन संपविण्यापूर्वी लिहून ठेवलेली चिठ्ठी पोलिसांनी जप्त केली आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे की, "मी अभ्यास करू शकत नाही. मी जेईई परीक्षेची तयारी करत आहे, पण ते माझ्या क्षमतेच्या पलीकडेचे आहे. माफ करा."
अभिषेक लोढा हा मध्य प्रदेश राज्यातील गुणा येथील होता. तो मे महिन्यात जेईईची तयारी करण्यासाठी कोटा येथे आला होता. त्याने स्वतः कोटामध्ये क्लास करणार असल्याबाबत आग्रही होता, अशी माहिती अभिषेकचा मोठा भाऊ अजय याने दिली. अभिषेकचा मृतदेह घेण्यासाठी कोटा येथे आलेल्या त्याच्या काकांनी सांगितले की, "आम्ही दररोज त्याच्याशी बोलत होतो. कधीही त्याने अभ्यासाबद्दल ताण व्यक्त केला नाही. सर्व काही काही ठीक आहे. नियमित अभ्यास सुरु असल्याचे तो सांगत असे."
परीक्षेचा ताण सहन न झाल्याने अभिषेकने जीवन संपवले, कोटा येथील पोलिसांनी सांगितले. दरम्यान, कोटा येथे बुधवार, ८ जानेवारी रोजी हरियाणाच्या महेंद्रगड येथील नीरज याने जीवन संपवले होते. राजस्थानमधील कोटा शहर हे बारावीनंतरच्या स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांची तयारी करण्याच्या क्लाससाठी प्रसिद्ध आहे. मागील वर्षी २०२४ मध्ये कोटामध्ये आत्महत्यांची संख्या ३८% ने कमी होऊन १७ झाली होती. २०२३ मध्ये कोटात २४ विद्यार्थ्यांनी जीवन संपवले होते.